Pune News : पुण्यातून बाहेर जाण्यासाठी ‘डिजिटल पास’ गरजेचा, ‘या’ वेबसाईटवरून काढता येणार डिजिटल पास

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक कारण असेल तरच पुण्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक कामांसाठी बाहेर जाण्यासाठी देखील पोलिसांनी डिजिटल पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

यासाठी पुणे पोलिसांनी covid19-mhpolice-in ची वेबसाईट तयार केली असून याद्वारे हे डिजिटल पास देण्यात येणार आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयात यासाठी डिजिटल पास कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून हा कक्ष 24 तास सेवा देणार आहे.

जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा गंभीर आजार, लग्न, हॉस्पिटल या कारणासाठी पुणे शहरातील नागरिकांना जिल्हा बाहेर जायचे असल्यास पोलिसांकडून डिजिटल पास देण्यात येत आहे. यासाठी नागरिकांना आवश्यक ती कागदपत्र ऑनलाइन द्यावी लागणार आहेत. लग्नसमारंभासाठी वधू वर त्यांचे आई-वडील भाऊ-बहीण काका, आत्या, मावशी अशांनाच हे पास देण्यात येणार आहेत. त्यासाठी लग्नपत्रिका सोबत जोडणे आवश्यक आहे.

अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले अधिकृत ओळखपत्र प्रवासादरम्यान सोबत बाळगावे. कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी प्रवासाला परवानगी देण्यात येणार नाही. विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रवास करण्यासाठी डिजिटल पास देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.