Pune News : पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ‘डिप्लोमा कोर्स’; अर्ज प्रक्रिया सुरु

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने छत्रपती शिवाजी महाराजांवर ‘डिप्लोमा कोर्स’ सुरू केला आहे. महाराजांची युद्धनीती, महाराजांचे प्रशासक म्हणून असलेले कार्य, महाराजांनी राबवलेली कल्याणकारी योजना आणि महाराजांची अर्थनीती याचे धडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमातून मिळणार आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज : व्हिजन एँड नेशन बिल्डिंग’ असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामाजिक शास्त्र विभागातर्फे हा एक वर्षाचा कोर्स सुरू करण्यात आला असून या अभ्यासक्रमासाठीची अर्जप्रक्रिया देखील सुरू झाली आहे. हा अभ्यासक्रम दोन सहामाही सत्रांमध्ये विभागला आहे. प्रत्येक सत्रात चार विषय असे एकूण आठ विषयात अभ्यासक्रांची विभागणी केली आहे. प्रत्येक विषयाला चार क्रेडिट आणि शंभर गुण देण्यात आला आहे. एकूण 32 क्रेडिट आणि 800 गुणांचा अभ्यासक्रम आहे.

अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात युद्धशास्त्र व युद्धनीती, नीतीकार, प्रॅक्टिकल कंपोनेंट एँड रिसर्च मेथडॉलॉजी हे विषय आसतील तर, शिवाजी महाराजांचे आरमार, प्रशासन, फील्ड व्हिजिट एँड प्रोजेक्ट रिपोर्ट हे विषय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सत्रात शिकवले जाणार आहेत. 14 जूनपासून या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. चार जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.