Pune News : जमावबंदी आदेश लागू करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींशी चर्चा करा : अजित पवार

एमपीसी न्यूज – पुणे शहर, पिंपरी – चिंचवड आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अद्यापही नागरिकांमध्ये जागृती होत नाही. कारण नसताना बिनधास्त लोक फिरत आहेत. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही जमावबंदी आदेश लागू करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असे आदेश शुक्रवारी (दि. 18 सप्टेंबर) उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज लोकप्रतिनिधीची आढावा बैठक विधानभवन येथे घेण्यात आली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,  राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ व इतर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णदर आणि मृत्यूदर कमी होणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णांना वेळेत ऑक्सिजनयुक्त खाटा व योग्य उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने काम करावे. जिल्ह्यात गृह सर्वेक्षणावर भर देवून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे पवार म्हणाले.

पुण्यातही मुंबईच्या धर्तीवर नागरिकांसाठी आचारसंहिता लागू केली जाणार आहे. दोन पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र उभे राहता येणार नाही.

आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, किंवा रस्त्यावर फिरता येणार नाही, कुठल्याही कारणास्तव मास्कचा वापर टाळता येणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.