एमपीसी न्यूज : – पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ 180 रुपयाच्या कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने छातीत आणि गुप्तांगावर दगड मारून मित्राचा खून केल. भोर येथील स्मशानभूमीच्या शेडमध्ये ही घटना घडली.. अक्षय गायकवाड असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला अवघ्या तीन तासात पोलिसांनी अटक केली आहे. देवराम माने असं आरोपीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी या दोघांनाही दारू पिण्याची सवय होती. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास दोघेही भोर येथील स्मशानभूमीच्या शेडमध्ये बसून दारू पीत होते. यावेळी अक्षयने देवरामच्या खिशातुन 180 रुपये काढून घेतले. यावरून दोघांत वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झालं. त्यानंतर देवराम याने अक्षय छातीवर आणि गुप्तांगावर दगड मारला. त्यानंतर विव्हळत पडलेल्या अक्षयला सोडून तो तिथून पळून गेला.
काही वेळानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर अक्षयला भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. भोर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.