Pune News : उद्धव ठाकरे यांना ‘उठा’, शरद पवार यांना ‘शप’ म्हणायचं का? – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडी सरकार हे गोंधळलेलं सरकार आहे यात सामान्य माणूस भरडला जातोय. तसेच, चंपा, टरबूज्या असं म्हटलं जाऊ नये आम्ही मर्यादा पाळतो. उद्धव ठाकरे यांना ‘उठा’, जयंत पाटील यांना ‘जपा’ आणि शरद पवार यांना ‘शप’ म्हणायचे का? पण आमची ही संस्कृती नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.

पाटील पुढे  म्हणाले की, निवडणुकीपूर्वी असलेली युती स्वाभाविकपणे अस्तित्वात यायला हवी होती. परंतु, ज्यांना नाकारलं होतं ते सत्तेत आले. अकृत्रिमपणे निर्माण झालेल्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षभरात खुर्चीसाठी वाटेल तो अपमान सहन करणं, पण भाजप सत्तेत येईल, या भीतीने पुन्हा एकत्र येणं असे प्रकार घडले आहेत. हे संपूर्णपणे गोंधळलेले सरकार आहे.

या वर्षभरात अनेक भ्रष्टाचार झाले. कोरोनातही भ्रष्टाचार झाले. प्रत्येक भ्रष्टाचार बाहेर येईल. त्यांचे वाभाडे निघतील म्हणून हे सरकार अधिवेशन घ्यायला घाबरत असल्याचा आरोप चंद्रकात पाटील यांनी केला. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी अधिवेशन घेऊन दाखवावं, असे आव्हान त्यांनी दिले.

सरकारने कर्जमाफी केली, ती देखील व्यवस्थित झालेली नाही. शिक्षण क्षेत्रातही चांगले काम नाही. शाळा सुरु करण्याबाबत संभ्रम असल्याचं पाटील म्हणाले.

सध्या शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला आहे. कोणी म्हणतं आज शाळा सुरू होईल, कोणी म्हणतं होणार नाही. तोच गोंधळ आता दहावीच्या परीक्षेवरून सुरू आहे. शिक्षण क्षेत्राची अवस्था वाईट झाली आहे, असं त्यांनी नमूद केलं.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळाली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही. या सरकारने मराठा आरक्षणाचे मातेरे करून टाकले.

देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कष्टाने आरक्षण मिळून दिले होते. पण या सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही, असं चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.