Pune News: जम्बो हॉस्पिटलसाठी डॉक्टर, नर्सची पळवापळवी; भाजप नगरसेवक प्रवीण चोरबेले यांचा आरोप

डॉक्टर्स, नर्स आणि इतर वैद्यकीय सहाय्यकांचा पुरवठा करण्याची निविदा पीएमआरडीने काढून संबंधित कंपनीस काम दिले आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांच्या सोयीसाठी उभारण्यात येणारे जम्बो हॉस्पिटल सातत्याने वादात अडकत आहे. आता तर या हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी शहरातील डॉक्टर, नर्सची पळवापळवी सुरू झाली आहे. डॉक्टर्स, नर्स आणि इतर वैद्यकीय सहाय्यकांचा पुरवठा करण्याची निविदा पीएमआरडीने काढून संबंधित कंपनीस काम दिले आहे. मात्र, या कंपन्यांकडून पुणे महापालिकेने करार केलेल्या खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स यांनाच मोठ्या पगाराचे आमिष देऊन पाठविण्याचे काम सुरू झाले आहे.

डॉ. संदीप गुप्ता (मो. क्र. 7900022755) आणि डॉ. धनश्री (मो. क्र. 8412866979) या अपरिचित डॉक्टरांव्दारे, जम्बो हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी मोठ्या पगाराचे आमिष दिले जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी केला आहे.

पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करून, संबंधित प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोरोनाचे संकट गंभीर असताना अशा प्रकारे डॉक्टर आणि नर्सची पळवापळवी करणे बरोबर नसल्याचे प्रवीण चोरबेले यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जम्बो हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी डॉक्टरांना 60 हजार रूपये, नर्स यांना 35 ते 40 हजार मासिक वेतन, निवास भोजन व्यवस्था आणि दररोज पीपीई किटची ऑफर देण्यात आली आहे. जम्बो हॉस्पिटलसाठी 80 ते 85 कोटी रूपये खर्च ‘पीएमआरडीए’तर्फे करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.