Pune News : मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांना भीत नाही काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दसरा मेळावा आणि ‘सामना’च्या मुलाखतीमध्ये ‘विरोधकांना बघून घेऊ’ही भाषा वापरत आहेत. ही आपली राजकीय संस्कृती नाही. त्यांच्या धमक्यांना आजिबात घाबरत नाही, भीक घालत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पाटील पुढे म्हणाले, चंपा काय, टरबुज्या काय ही काय भाषा आहे. टीका करण्याची ही भाषा आहे, ही आपली राजकीय संस्कृतीच नाही. आम्ही उद्धव ठाकरेंना ‘उठा’, अजित पवारांना ‘अपा’ शरद पवारांना शपा आणि जयंत पाटील यांना जपा म्हटले तर चालेल. ॲक्शन रिॲक्शनच्या खेळात सर्वसामान्य जनतेचं मरण होत आहे. त्यामुळे भाषा सुधारावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केला.

13 महिन्यांपुर्वी भाजपला 105 जागा आणि शिवसेनेला 56 असा महायुतीला कौल दिला होता. परंतु निवडणूकपूर्व आघाडी तोडून अनैसर्गिक, अकृत्रिम सरकार स्थापन झालं. त्यांचं सरकार विसंवादामुळे पडेल असे आम्ही म्हणत होतो. पण मी स्वत: किंवा देवेंद्र फडणवीस यांनी कधीही हे सरकार येत्या तीन महिन्यात पडेल असा दावा केलेला नाही. उलट गेली वर्षभर खुर्चीसाठी धडपडणारे, अपमान गिळून खुर्चीला चिकटणारे सरकार बनले. गेले वर्षभर सत्ता टिकविण्याची धडपड करण्यातचं गेले. सकाळी भांडून रात्री पुन्हा एकत्र यायचं हाच कार्यक्रम सुरू आहे. सरकार पडण्यापेक्षा त्यांनी सरकार टिकवून चालवून दाखवावं आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत राहू, असे ही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.