Pune News : जायका प्रकल्पात चांदणी चौकासारखी दिरंगाई करू नका; केंद्रीय मंत्री गडकरींनी अधिकाऱ्यांना फटकारले

एमपीसी न्यूज : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या चांदणी चौकातील पुनर्वसनासारखी दिरंगाई मुळा-मुठा नदी सुधार योजनेतील जायका प्रकल्पात करू नका, असे खडे बोल सुनावित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे महापालिकेच्या पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना फटकारले.

मोठ्या प्रकल्पांच्या कामात महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या प्रशासकीय कामकाजाच्या दिरंगाईवर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पालिकेच्या जायका कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाच्या दिल्लीतील सादरीकरणावेळी नाराजी व्यक्त केली. यावेळी चर्चेत भूसंपादनाच्या विषयावरून गडकरी यांनी महापालिकेने ‘जायका प्रकल्पाचा चांदणी करू नका’, असे खडसावून सुनावत पालिकेच्या प्रशासकीय कामकाजावरच बोट ठेवले आहे.

मुळा मुठा नदी सुधार योजने अंतर्गत जायका कंपनीच्या माध्यमातून सुमारे 991 कोटी रूपये खर्चून जायका कंपनीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी महापालिका राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत गडकरी यांची भेट घेतली, त्यासाठी गडकरी यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह खासदार गिरिष बापट आणि पालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी पालिकेकडून या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले, तसेच या प्रकल्पाचे काम भूसंपादना अभावी रखडल्याची कबूली देण्यात आली. नेमका हाच धागा पकडत गडकरी यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवले.

महापालिकेकडून चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या बहुमजली उड्डाणपूलाचे काम गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन करून सुरू केले. मात्र, काम संपण्याची मुदत आली तरी भूसंपादना अभावी व त्यावरून मोबदला कोणी द्यायचा यावरून हा पूल अद्यापही अर्धवटच कामातच रखडलेला आहे. त्यावरून गडकरी यांनी अनेकदा थेट शब्दात पालिकेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. जायका प्रकल्पाच्या बैठकीतही पालिका प्रशासनाच्या कारभारावर असलेली गडकरींची नाराजी पुन्हा दिसून आली.

जायका प्रकल्पासाठीच्या बाणेर आणि वारजे येथील जागांचे भूसंपादन पालिकेने तातडीनं करावे त्याची आवश्‍यक असलेली तरतूद उपलब्ध करून द्यावी असे सांगत; ” जायका’ प्रकल्पाचा “चांदणी चौक’ होऊ देऊ नका अशा शब्दात पालिका पदाधिकारी आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना सुनावले, या वेळी या दोन्ही प्रकल्पासाठीचे जागामालक रोख मोबदला घेऊन जागा देण्यास तयार असून त्यासाठी लवकरच 23 कोटींच्या निधीचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून या बैठकीत सांगण्यात आले. त्यानंतर गडकरी यांनी निविदांच्या आधी भूसंपादन पूर्ण करून काम सुरू करण्याच्या सूचनाही दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.