Pune News : आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी आणि संस्कृतीला विसरु नका – राज्यपाल

एमपीसी न्यूज – आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राज्यपाल बोलत होते.

या कार्यक्रमासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, संस्थेचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा.सुरेश तोडकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव आदी उपस्थित होते.

यावेळी सेंट्रल सॉफीस्टीकेटेड ऍनालेटिकल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी आणि प्रिन्सिपल व्हर्च्युअल केबीनचे डिजिटल स्वरुपात अनावरण व सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच प्रा.डॉ. गजानन एकबोटे व प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कोश्यारी पुढे म्हणाले, भारत हा प्राचीन काळापासून अनेक गोष्टींमध्ये अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो, भविष्यात देखील आपला देश विविध बाबींमध्ये अग्रेसर ठरण्यासाठी आपल्या ज्ञानाचा देशहितासाठी उपयोग करा आणि जगभरात चांगले नाव कमवा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर म्हणाले, विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देऊन त्यांना दर्जेदार शिक्षण देणे तसेच त्यांना आपल्या शैक्षणिक संस्थेत टिकवून ठेवणे हे आव्हान असते.

विद्यार्थी हिताचे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करुन त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे करणे महत्वाचे असते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेत विविध चांगल्या संकल्पना व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक संस्थेच्या सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले. संस्थेच्या वाटचालीबाबत प्रा. डॉ. अंजली सरदेसाई यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

सूत्रसंचालन कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.