Pune News : पुण्याचे पाणी कमी करु नका : महापौर

कालवा समिती बैठकीत महापौर मुरलीधर मोहोळांची आग्रही मागणी

एमपीसी न्यूज – भामा आसखेडचे पुणे शहराला 2.6 टीएमसी पाणी नव्याने मिळत असल्याने खडकवासला प्रकल्पातून पुणे शहराला मिळणारे तितकेच पाणी कमी करावे, या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाला विरोध असून पुणे शहराचे पाणी कमी करु नये, अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली.

पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत महापौर मोहोळ यांनी भूमिका मांडली.

_MPC_DIR_MPU_II

महापौर मोहोळ म्हणाले, ‘पुणे शहराची लोकसंख्या, समाविष्ट गावांच्या पाण्याची गरज आणि भविष्यातील एकूणच गरज लक्षात घेत पुणे शहराची पाणी कपात करणे चुकीची आहे. 2001 साली वार्षिक 11.50 टीएमसी पाण्याचा करार झाला होता. मात्र त्यानंतर पाणी वाढवून द्यावे यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. मात्र निर्णय होऊ शकलेला नाही. त्याउलट पाणीकपात करण्याची पुणेकरांच्या विरोधातील भूमिका जलसंपदा विभागाने घेतली आहे. सद्यस्थितीत पुणे शहराला 18.5 टीएमसीची आवश्यकता आहे.

‘पुणे महानगरपालिकेचा गळती कमी करण्याचा प्रयत्न असून 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेमुळे ही पाणीगळती कमी होणार आहे. शिवाय जायका प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी सिंचनासाठी वापरता येणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने आपली भूमिका मागे घ्यावी’, असेही मोहोळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.