Pune News : पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकपदावर डॉ. अभिनव देशमुख यांची नियुक्ती

कोल्हापूरमध्ये नियुक्ती होण्याआधी त्यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला

एमपीसी न्यूज –  पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकपदावर डॉ. अभिनव देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. देशमुख कोल्हापूर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. 17 सप्टेंबर रोजी गृहमंत्रालयाने पोलीस अधीक्षक संवर्गातील राज्यातील 22 अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश दिले. त्यात डॉ. देशमुख यांची कोल्हापूर पोलीस अधीक्षक पदावरून पुणे पोलीस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे.

यापूर्वी 2 सप्टेंबर रोजी गृहमंत्रालयाने काढलेल्या बदल्यांच्या आदेशात पुणे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांची गडचिरोली येथे बढतीवर बदली केली. संदीप पाटील हे गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक पदावर रुजू झाले आहेत.

मागील पाच वर्षांपूर्वी संदीप पाटील गडचिरोली येथे कार्यरत होते. त्यावेळी तिथे त्यांनी पुस्तक दान हा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळाला. गडचिरोली परिसरातील नक्षलवादाचा बिमोड करण्यात पाटील यांना मोठे यश आले होते.

दोन वर्षांपूर्वी त्यांची पुणे जिल्हा पोलीस प्रमुख पदावर बदली झाली. इथेही त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम राबवले. पुणे जिल्हा पोलीस दलात त्यांनी सुरु केलेला स्मार्ट पोलिसिंग हा उपक्रम राज्यात गाजला. राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील संदीप पाटील यांनी सुरु केलेल्या या स्मार्ट पोलिसिंग उपक्रमाचे भरपूर कौतुक केले. संदीप पाटील यांनी पुन्हा गडचिरोली हा भाग स्वतःहून मागून घेतल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

तर कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. अभिनव देशमुख यांची पुणे जिल्हा पोलीस प्रमुख पदावर बदली करण्यात आली आहे. डॉ. देशमुख देखील कोल्हापूर येथे येण्यापूर्वी गडचिरोली येथे कार्यरत होते. तिथल्या नक्षलग्रस्त भागात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेतली आहे.

कोल्हापूर येथे कार्यरत असताना त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे ‘आंतरिक सुरक्षा सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे. डॉ. देशमुख यांचीही कोल्हापूर येथील कारकीर्द चांगलीच गाजली आहे. यापुढे पुणे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून ते कोणते नवीन उप्रकम, योजना राबवतात. तसेच गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.