Pune News: पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख यांची वर्णी

Pune News: Dr. rajesh deshmukh appointed as a Collector of pune district डॉ. योगेश म्हसे, आयुष प्रसाद, जी. श्रीकांत यांना मागे टाकत देशमुख वरचढ ठरले आहेत.

एमपीसी न्यूज – पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची माळ हाफकिन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांच्या गळ्यात पडली आहे. राज्य सरकारने त्यांची आज (दि.17) नियुक्ती केली आहे. अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

डॉ. योगेश म्हसे, आयुष प्रसाद, जी. श्रीकांत यांना मागे टाकत देशमुख वरचढ ठरले आहेत. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे देशमुख यांच्यासाठी आग्रही होते. त्यांनी देशमुख यांच्या नावाला पसंती दिली होती.

नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्याने देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारीपद पश्‍चिम महाराष्ट्रात महत्वाचे मानले जाते. या पदावर येण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष आणि स्पर्धा असते. पुण्याचे जिल्हाधिकारीपद भूषविणे ‘आयएएस’ अधिकाऱ्यांसाठी नेहमीच प्रतिष्ठेचे राहिले आहे. त्यामुळे या पदावर येण्यासाठी नेहमीच अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ असते.

पुण्याचे नवे जिल्हाधिकारी कोण होणार याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय वर्तुळात सुरू होती. त्यामध्ये देशमुख यांच्यासह लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत, मुंबई ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे, ‘पीएमआरडी’चे आयुक्त सुहास दिवसे आदींची नावे चर्चेत होती.

राष्ट्रवादीने देशमुख यांचे नाव उचलून धरले होते. तर, शिवसेनेने जी. श्रीकांत यांचा नावाचा आग्रह केला होता. काँग्रेसने डॉ. योगेश म्हसे नाव पुढे केल्याची चर्चा होती.

त्यामध्ये डॉ. राजेश देशमुख यांचे पारडे वरचढ ठरले असून त्यांनी बाजी मारली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.