Pune News : डॉ. श्रीकांत बहुलकर यांची ऑक्सफर्ड विद्यापीठाचे वरिष्ठ फेलो म्हणून निवड

एमपीसी न्यूज – ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीज (ओसीएचएस) या अध्ययन केन्द्राने वरिष्ठ फेलो म्हणून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी मानद सचिव व ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रा. श्रीकांत बहुलकर यांची एकमताने निवड केली आहे.

प्रा. बहुलकर यांची विद्वत्तापूर्ण कारकीर्द ओसीएचएसच्या ध्येयांशी जुळत असून त्यांच्या आयुष्यभराच्या अभ्यासपूर्ण कार्याचा हा गौरव असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठाने म्हटले आहे.

संस्कृत भाषेतील विद्वत्तेच्या संदर्भात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला खूप मान्यता असल्याने या घटनेमुळे ऑक्सफर्ड सेंटर आणि भांडारकर संस्था यांच्यातील मतांची देवाणघेवाण वाढवेल. ओसीएचएस या केंद्राची स्थापना 1997 मध्ये हिंदू संस्कृती, तत्त्वज्ञान आणि धर्मांचा अभ्यास करण्यासाठी झाली असून जगातील अशा प्रकारची ही पहिली अकादमी आहे. प्राचीन हिंदू ग्रंथांबद्दल जाणून घेण्यात रस असलेल्या आंतरराष्ट्रीय लोकांसाठी हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जागतिक दर्जाचे अभ्यासक ही संस्था एकत्र आणते.

प्रा. बहुलकर हे गेली 40 वर्षे अध्ययन क्षेत्रात कार्यरत असून प्रामुख्याने संस्कृत व बौद्ध विद्येचे अभ्यासक आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्धविद्या विभागात ते संलग्न प्राध्यापक आहेत. वेद, संस्कृत, पाली, बौद्धविद्या अशा विविध विषयांवरील त्यांच्या संशोधनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. प्रा. बहुलकर यांनी विविध देशांमधील ख्यातनाम विद्यापीठांमध्ये अध्यापन केले आहे. त्यांची आजपर्यंत विविध विषयांवरील 12 पुस्तके प्रकाशित झाली असून सुमारे 65 संशोधनपर लेख लिहीले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.