Pune News : डीएसकेंच्या 6 वर्षीय नातवाचा बंगल्यासाठी न्यायालयात अर्ज

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्यावरील कोट्यावधी रुपयांची फसवणूक प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेतून त्यांचा चतुःशृंगी येथील निवासी बंगला वगळण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज शुक्रवारी (ता. 25) न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. हा अर्ज डीएसके यांचा 6 वर्षीय नातू दक्ष शिरीष कुलकर्णी याने केला असल्याचे समोर आले आहे.

विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू असून हा निवासी बंगला डिसेंबर 2016 मध्ये बक्षीसपत्राद्वारे नातू दक्ष शिरीष कुलकर्णी याच्या नावे केला गेला आहे. तसेच अल्पवयीन मुलाच्या नावावर असलेली संपत्ती जप्त करता येऊ शकत नाही. त्यामुळे जप्तीतून तो बंगला वगळण्यात यावा, अशी विनंती या अर्जात केली असल्याचे डीएसके यांचे वकील अ‍ॅड. आशिष पाटणकर, अ‍ॅड. प्रतीक राजोपाध्ये यांनी सांगितले.

डीएसके यांचा चतुःशृंगी येथे 40 हजार चौ.फूट बांधकाम असलेला ‘सप्तशृंगी’ हा बंगला डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जप्त करण्यात आला आहे. मात्र त्याच्या जप्तीवर बचाव पक्षाने आक्षेप घेतला आहे. तसेच डीएसके यांनी बंगल्याची जागा 1996 मध्ये विकत घेऊन त्यासाठी आवश्यंक कायदेशीर बाबींची पूर्तता करून 2006 मध्ये तिथे बंगला बांधण्यात आला.

डीएसके यांच्यावर दाखल असलेले गुन्हे 2006 नंतर घडले, 2017 मध्ये त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यामुळे या गुन्ह्याशी संबंधित पैशांमधून हा बंगला घेण्यात आलेला नाही. तसेच हा बंगला आता सहा वर्षीय नातवाच्या नावावर आहे. त्यामुळे कायद्यानुसार या बंगल्याचा समावेश जप्त मालमत्ता सूचीमध्ये येणार नाही, असेही अ‍ॅड. राजोपाध्ये यांनी सांगितले.

यापूर्वी डीएसके यांची चार महागडी वाहने यापूर्वी लिलावातून वगळण्यात आली होती. स्थगिती दिलेल्या वाहनांमध्ये दोन बीएमडब्ल्यू, एक पोर्शे आणि टोयोटा कंपनीच्या एका वाहनाचा समावेश आहे. लिलाव करण्यात येत असलेली तेरापैकी आठ वाहने ही डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची असल्यामुळे ती विकण्यात येऊ नये, असा अर्ज बचाव पक्षाकडून तीन फेब्रुवारी रोजी करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.