Pune News : वीजबिलांच्या थकबाकीचे ओझे 2685 कोटींवर

महावितरणची आर्थिक स्थिती डबघाईस; वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई

एमपीसी न्यूज – प्रामुख्याने वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच संपूर्ण आर्थिक मदार असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वाढत्या थकबाकीमुळे डबघाईस आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सध्या वीजपुरवठा सुरु असलेल्या लघुदाबाच्या (कृषी वगळून) 24 लाख 48 हजार 183 ग्राहकांकडे तब्बल 2 हजार 685 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या ओझ्यामुळे वीजखरेदीसह दैनंदिन देखभाल व इतर खर्चासाठी आर्थिक कसरत सुरु असल्याने नाईलाजास्तव महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये कृषी ग्राहक वगळता इतर सर्व 11 लाख 34 हजार 710 ग्राहकांकडे सद्यस्थितीत 1157 कोटी 4 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. यामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 11 लाख 13 हजार 349 ग्राहकांकडे 586 कोटी 55 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांच्या 2562 वीजजोडण्यांचे 108 कोटी 50 लाख रुपयांची थकबाकी आहे.

वारंवार आवाहन करून देखील थकबाकीचा भरणा होत नसल्याने थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला महावितरणने आता मोठा वेग दिला आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी देखील या मोहीमेत सहभागी झाले आहेत. थकीत वीजबिलांचा भरणा सोयीचा व्हावा यासाठी शनिवारी (दि. 17) व रविवारी (दि. 18) या सार्वजनिक सुटीच्या दिवशी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

दरम्यान 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानातून पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल संबंधीत ग्रामपंचायतींद्वारे अदा करण्याचे राज्य शासनाने नुकतेच आदेश दिला आहे. त्याप्रमाणे ग्रामपंचायतींकडून सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु काही ग्रामपंचायतींनी वीजबिलांच्या थकबाकीमुळे महावितरणच्या वीजयंत्रणेवर कर लावण्याचा इशारा दिला आहे. मात्र या कराचा भुर्दंड सर्वसामान्य वीजग्राहकांवर वीजदराच्या स्वरुपात पडणार असल्याने ग्रामपंचायती, नगरपालिका व महानगरपालिकांनी शासकीय कंपनीच्या वीजयंत्रणेवर कोणत्याही कराची आकारणी करू नये, असा आदेश 2018 मध्ये राज्य शासनाने दिला आहे.

अतिदुर्गम खेड्यापाड्यांपासून सर्वच क्षेत्रात वीजसेवा देणाऱ्या व जनतेच्या मालकीची वीज कंपनी असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वीजबिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे सध्या गंभीर आहे. या अत्यंत कठीण अवस्थेत महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करावा, असे कळकळीचे आवाहन महावितरणकडून आले आहे. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या बिलांचा भरणा करण्यासाठी http://www.mahadiscom.in  ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधीत वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.