Pune News : जिल्ह्यात 1081 कोटींची वीजबिल थकबाकी, भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित होणार

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहक नियमित वीजबिलांचा भरणा करीत असल्याने तसेच बिलींग सायकलमुळे एरव्ही दरमहा 70 ते 80 कोटी रुपयांची थकबाकी दिसून येत होती. मात्र, हीच थकबाकी आता तब्बल 1081 कोटी 41 लाख रुपयांवर गेली असल्याने महावितरणच्या महसुली तुटमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. थकीत वीजबिल भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.

‘कोरोना’च्या गेल्या 10 महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी तब्बल 803 कोटींनी वाढली आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करून थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे. अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. .

पुणे जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये सुमारे 36 लाख 90 हजार ग्राहक आहेत. मार्च 2019 मध्ये 5 लाख 95 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे केवळ 62 कोटी 38 लाख रुपयांची थकबाकी होती. मार्च 2020 मध्ये 8 लाख 94 वीजग्राहकांकडे 278 कोटींची थकबाकी होती.

ही थकबाकी वसुल करण्यापूर्वीच मार्चमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरु झाला. तेव्हापासून वीजबिल वसुलीवर मोठा परिणाम सुरु आहे. अनलॉकनंतरही थकीत व चालू वीजबिलांचा भरणा फारसा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती सध्या हलाखीची झाली असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक औद्योगिक वर्गवारीतील 13 लाख 86 हजार वीजग्राहकांकडे तब्बल 1081 कोटी 41 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यात सर्वाधिक घरगुती 11 लाख 56 हजार 750 ग्राहकांकडे 635 कोटी 49 लाख, वाणिज्यिक 1 लाख 94 हजार 250 ग्राहकांकडे 295 कोटी 55 लाख तर औद्योगिक 27 हजार 970 ग्राहकांकडे 150 कोटी 36 लाख रुपयांची थकबाकी आहे.

गेल्या डिसेंबर 2020 पर्यंत तब्बल 803 कोटींच्या थकबाकीचा डोंगर वाढला तरी महावितरणने कोणत्याही थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. मात्र केवळ वीजबिलांच्या वसुलीवर आर्थिक भिस्त असणाऱ्या महावितरणची स्थिती वीजखरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च भागविण्याइतपत सध्या राहिलेली नाही. त्यामुळे थकबाकीदारांना नियमाप्रमाणे नोटीस पाठवून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

चालू वीजबिल तसेच थकबाकीची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय करून देण्यात आली आहे. वीजबिलांच्या तक्रारी असल्यास त्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील वीजग्राहकांनी थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.