Pune News : कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवरील कारवाईसाठी पथके स्थापन करा : आयुक्तांचे आदेश

थकाने केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल संबंधित महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी उप आयुक्त (परिमंडळ) यांच्या मार्फत आयुक्तांकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई करण्यासाठी पथके स्थापन करा, असे स्पष्ट आदेश पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी (दि. 16 सप्टेंबर) दिले आहेत.

क्षेत्रीय स्तरावर महापालिका सहाय्यक आयुक्तांनी अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक असे एकूण 3 कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यास सांगितले आहे.

या पथकाने केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल संबंधित महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी उप आयुक्त (परिमंडळ) यांच्या मार्फत आयुक्तांकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील जीवनावश्यक सेवा, दुकाने, मार्केट सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन काळात टप्पेनिहाय सुरू करण्यात आले आहेत. दुकाने आणि मार्केटमध्ये येणाऱ्या नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

त्यासाठी वेळोवेळी बजावण्यात आलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास अडचणी येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

पुणे शहरातील दुकानदारांकडून विविध आदेशान्वये कोविड – 19 उपाययोजना विषयक बाबींचे आणि नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

पुण्यात दि. 30 सप्टेंबर 2020 च्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. या कालावधीत कोविड – 19 या आजाराच्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी उपाययोजना व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.