Pune News : महापालिका निवडणुकीआधीच राष्ट्रवादीत वाढली प्रचंड गटबाजी

विरोधी पक्षनेत्यांना डावलणाऱ्यांची अजित पवारांकडून कानउघाडणी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका निवडणूक जवळ येत असतानाच आता राष्ट्रवादीत प्रचंड गटबाजी उफाळून आली आहे. हडपसर, धनकवडी आणि बाणेरमधील काही मातब्बर मंडळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतात. त्याची विरोधी पक्षनेत्यांना काहीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे अशा प्रकारचे या मंडळींचे वागणे बरोबर नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या सर्व मंडळींची अजित पवार यांनी चांगलीच कानउघाडणी केल्याची महापालिकेत कुजबुज सुरू आहे.

कोरोना संदर्भात होणाऱ्या आढावा बैठकीसाठी यापुढे विरोधी पक्षनेत्यांनाही बोलविण्याची सूचना अजित पवार यांनी दिल्याचे समजते. आगामी पुणे महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादी – काँग्रेस – शिवसेना या महाविकास आघाडीतर्फे लढविण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे आणि पिंपरी – चिंचवड या दोन्ही महापालिका भाजपच्या ताब्यातून घेण्यासाठी व्युहरचना आखण्यात येत आहे. या निवडणुकिसाठी वॉर्ड की दोन वॉर्डांचा प्रभाग यावरही चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकीसाठी चार वॉर्डांचा प्रभाग होणार नसल्याचे सांगण्यात येते.

पुणे महापालिकेतच आणखी 23 गावे समाविष्ट करायची की वेगळी महापालिका करायची, यावर चर्चा सुरू आहे. याबाबत आमदार तुपे यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

जम्बो रुग्णालय वेळेत पूर्ण न झाल्याने खासदार गिरीश बापट यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले होते. त्यावेळी स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी बापट यांची बाजू उचलून धरली होती.

कोरोनाच्या काळात पुणे महापालिकाच काम करीत असल्याचे बिडकर यांनी निक्षून सांगितले होते. त्याचीही कल्पना अजित पवार यांना देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.