Pune News : कम्युनिट फार्मिंग प्रकल्पासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला उत्कृष्टता पुरस्कार

एमपीसी न्यूज – पर्यावरण संवर्धन करण्याबरोबरच शहरातील नागरिकांनाही सामुदायिक शेतीची ओळख व्हावी आणि स्थानिक पातळीवर त्यामध्ये सहभागी होता यावे या उद्देशाने बालेवाडीत साकारलेल्या कम्युनिट फार्मिंग प्रकल्पासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला (पीएससीडीसीएल) उत्कृष्टता पुरस्कार (अवॉर्ड ऑफ एक्सलन्स) मिळाला आहे.

इलेट्स इंडिया ट्रान्स्फॉर्मेशन समिटमध्ये ‘जमीन वापराचे नियमन’ या श्रेणीमध्ये हा पुरस्कार पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांना प्रदान करण्यात आला.

बालेवाडी येथे स्थळ सुशोभीकरण (प्लेस मेकिंग) अंतर्गत पुणे स्मार्ट सिटीचा कम्युनिटी फार्मिंग हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यामध्ये सभोवतालच्या परिसरातील नागरिकांनी दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या विविध पालेभाज्या लावून शेतकऱ्यांप्रमाणे त्यांचे संगोपन करावे आणि त्याचा लाभ घ्यावा अशी संकल्पना आहे.

“या प्रकल्पामध्ये छोट्या पातळीवर विविध पालेभाज्या लावण्यात येतात. या परिसरात थोड्या प्रमाणात हिरवाई होण्यासोबतच आम्हाला व मुलांना सामुदायिक शेतीची संकल्पना कळते आणि त्याचा आनंद घेता येतो. ही चांगली संकल्पना आहे,” असे येथील रहिवासी नागरिकांनी सांगितले.

सीईओ डॉ. संजय कोलते म्हणाले, “पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने वीसपेक्षा जास्त विविध विषय संकल्पनांवर असे स्थळ सुशोभीकरण करण्यात येत आहे. पुरस्कारामुळे स्मार्ट सिटीला प्रोत्साहन मिळाले आहे. असेच इतर हाती घेतलेले प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेण्यात येतील.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.