Pune News : दहावी- बारावीच्या शिष्यवृत्तीसाठी 22 मेपर्यंत मुदतवाढ : मुरलीधर मोहोळ

एमपीसीन्यूज : पुणे महानगरपालिकेच्या वतीने इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसहाय्य योजनेतंर्गत विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा देखील ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी dbt.dpunecorporation. Org या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी 22 मेपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

यावेळी महापौर मोहोळ म्हणाले की, आपल्या शहरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. यासाठी महापालिकेच्या शिक्षण मंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात.

त्याचाच एक भाग असलेल्या मागील अनेक वर्षापासून पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे मनपाहद्दीत राहणाऱ्या दहावी व बारावीमध्ये 80 टक्के गुण मिळवलेल्या खुल्या गटातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी तसेच 70 टक्के गुण मिळविणारे पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय 65 टक्के गुण मिळवणारे तथापि 40 टक्के अपंगत्व असलेले विद्यार्थी यांना भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम कलाम आझाद योजनेअंतर्गत इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी 15000 रुपये आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी 25000 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते.

या योजनेमुळे शहरातील अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. मात्र यंदा कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. हे लक्षात घेऊन, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ, जो निर्णय घेईल. त्या अनुषंगाने स्थायी समितीची मान्यता घेऊन यावर्षीच्या दहावी आणि बारावीच्या शिष्यवृत्ती बद्दल निर्णय घेण्यात जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोना महामारीमुळे समाजातील अनेक घटकांचे नुकसान झाले आहे. त्यातून विद्यार्थी वर्ग देखील गेला आहे. या आपल्या विद्यार्थ्याच्या पाठीशी पुणे महापालिका कायम पाठीशी असून शहरातील सर्व विद्यार्थ्यां करिता येणार्‍या काळात अनेक नव नवीन योजना राबविल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.