Pune News: महापालिका निवडणूक जवळ येत असताना काँग्रेसमध्ये वाढली गटबाजी; थेट प्रदेशाध्यक्षांनाच पाठविले पत्र

शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणतात आमचे महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी काम सुरू

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतशी काँग्रेसमध्ये प्रचंड प्रमाणात गटबाजी वाढत आहे. थेट प्रदेशाध्यक्षांनाच आता पत्र पाठविण्यात आले आहे.

काँग्रेसचे पुणे महापालिकेतील गटनेते आबा बागूल यांच्या आदेशाकडे 7 नगरसेवकांनी दुर्लक्ष केले आहे. आपल्याला न विचारता इतर कोणाच्याही पत्रांवर सही करू नये, असे बागूल यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना सांगितले होते.

दरम्यान, काँग्रेसचे पुणे महापालिकेतील माजी गटनेते अरविंद शिंदे यांनी पुणे शहर काँग्रेसमधील गटबाजीची माहिती खुद्द प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पत्राद्वारे दिली आहे. या पत्रावर शिंदे यांच्यासह पुणे महापालिकेतील 7 नगरसेवकांच्या सह्या आहेत.

अरविंद शिंदे यांनी यापूर्वी पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनाही पत्र पाठवले होते. त्या पत्रावरही सर्व नगरसेवकांच्या सह्या होत्या. त्यामुळे गटनेते आबा बागूल यांनी आपल्याला न विचारता इतर कोणत्याही पत्रांवर सह्या करू नयेत, असे सांगितले होते.

मात्र, त्याकडे या नगरसेवकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे काँग्रेसमध्ये गटबाजी वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यासंदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, काँग्रेस पक्ष सध्या अडचणीत असताना त्याला बळकट करण्यासाठी आमचे काम सुरू आहे. आगामी पुणे महापालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी काम सुरू आहे.

वॉर्ड रचना आणि मतदारयादी संदर्भात बैठका सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी करून फार कमी मतांनी आमच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यांच्या संदर्भात मला काहीही बोलायचे नाही. सध्या ज्या काही बैठका होत आहेत. त्या केवळ पुणे महापालिका निवडणूक जिंकण्यासाठीच होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शासकीय समित्यांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीमध्ये चर्चा सुरू आहे. त्यासाठी अधिकृतरित्या विधानसभा लढविलेल्या उमेदवारांना, ज्येष्ठ नगरसेवकांना, नवीन नगरसेवकांना बोलवण्यात येत नाही. त्यामुळे तुमच्या भेटीची वेळ मिळावी. येत्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल, अशी मागणीही बाळासाहेब थोरात यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात केली आहे.

तर, काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलण्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यावर आता थोरात काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.