Pune News : कुटुंबाचा विचार मनात आला आणि आत्महत्येचा निर्णय बदलला – गौतम पाषाणकर

एमपीसी न्यूज – 21 ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेले गौतम पाषाणकर त्यांचा शोध अखेर संपला असून पुणे पोलिसांनी त्यांना जयपूर येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. आज सकाळी त्यांना पुण्यात आणल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत पोलिसांनी आणि स्वतः गौतम पाषाणकर यांनी घरातून निघून जाण्याची कारणे सांगितली.

पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वतः पाषाणकर यांनी मागील 32 दिवसांच्या प्रवासाचा उलगडा केला. कुटुंबाचा विचार आल्यामुळे आपण आत्महत्येचा निर्णय बदलल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्यानंतर पुणे पोलिसांची सहा वेगवेगळी पथके त्यांच्या मागावर होती. त्यांच्या मुलाने एका राजकीय व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला होता. यामुळे पाषाणकर बेपत्ता झाल्याच्या घटनेला वेगळे वळण लागले होते. मात्र तपास करताना पोलीस पाषाणकर यांचे अपहरण झाले नसून ते सुरक्षीत असल्याचे ठामपणे सांगत होते.

तपासादरम्यान पोलिसांना पाषाणकर यांचे कोल्हापूर येथील एका हॉटेलाच्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांना प्राप्त झाले. त्यांच्याकडे मोबाईल नसल्याने तसेच त्यांनी क्रेडीट व डेबिट कार्डचा वापर केला नसल्याने तांत्रिक तपास थांबला होता. मंगळवारी मात्र पाषाणकर जयपूरला असल्याचे तांत्रिक तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानूसार थेट विमानाने पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांचे पथक पाठवून त्यांना पुण्यात आणण्यात आले.

पाषाणकरांनी एकंदर प्रवासाबद्दल सांगताना मागील काही महिन्यात व्यवसायातील उलाढाल थांबली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात मानसिक कोंडी झाली होती. ती सुधरवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यातून बाहेर पडून न शकल्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. स्वारगेट येथे रिक्षाने आल्यावर बसने थेट कोल्हापूर गाठले. गाठीशी 80 हजाराची रोकड होती.

कोल्हापूरवरुन कोईम्बतूर, बंगलोर, तिरुपती बालाजी, कन्याकुमारी, जैसलमेर असा प्रवास करत थेट जयपूरला पोहचलो. आज(बुधवारी) जयपूर शहर सोडून निघणार होता. मात्र पोलिसांनी आदल्याच दिवशी मला गाठले. या कालावधीत कुटुंबाशी कोणताही संपर्क केला नाही. पण जेव्हा किरकोळ रकमेसाठी एका देणेकरी मनाला लागेल असे बोलतो, तेव्हा ते खूपच वाईट वाटते. ही सलच मनाला लागल्याने घर सोडले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.