Pune News : पोलीस आयुक्तालयातील फाईल्सचा प्रवास आता होणार सुपरफास्ट; फायल्सच्या निपट-यासाठी एसओपी तयार

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्तालयातंर्गत दाखल केलेल्या फाईल्सचा लवकर निपटारा करण्यासाठी आता एसओपी ठरविण्यात आली आहे. त्यानुसार फाईल इतरत्र कोठेही न फिरवता थेट संबंधित अधिका-यांच्या टेबलावर ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या विविध कार्यक्रमांच्या परवानग्यांसह, पोलीस कर्मच्या-यांच्या फाईल्सना लागणारा तीन ते चार आठवड्यांचा काळ संपणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार फाईल्सचा वेग आता सुपरफास्ट होणार आहे.

शहरातील नागरिकांकडून विविध कार्यक्रमांसह वाहतूकीच्या संदर्भातील वेगवेगळ्या परवानगीसाठीच्या अर्ज आणि फाईल पोलीस आयुक्तालयात जमा करण्यात येतात. मात्र, विविध कारणास्तव फाईल संबंधित नसलेल्या अधिका-यांकडे पाठविण्यात येत होेती. त्यामुळे किरकोळ परवानगीसाठी अनेकांना महिन्याभराची वाट पाहावी लागत होती. फाईल्सचा विनाकारण प्रवास वाढल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता.

आता मात्र, पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार फाईल क्लिअर करण्यासाठी संबंधित अधिका-यांकडे थेट पाठविली जाणार आहे. त्यामुळे वेळ वाचण्यास मदत होणार असून नागरिकांचे हेलफाटे वाचणार आहेत. विशेषतः गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, विविध मिरवणूका, राजकीय सभांच्या परवानगीसाठी पोलीस आयुुक्तालयात दाखल केलेल्या फाईल्सचा प्रवास कासवगतीने होत होता. मात्र, आता फाईल्सचा प्रवास थांबणार आहे. त्याशिवाय पोलीस कर्मचा-यांच्या भविष्यनिर्वाह निधी, मेडीक्लेम, सेवानिवृत्ती फंड संदर्भातील सर्व फायलींना तातडीने क्लिअर करण्यासाठी अधिका-यांना सूचित करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.