Pune News : अखेर ‘त्या’ मृतात्म्यांना मिळाली आज शांती

0

एमपीसी न्यूज – स्वतःच्या आप्तांची भेट मृत्यूनंतरसुद्धा न झालेल्या अभागी मृतांच्या आत्म्यांना आज खऱ्या अर्थाने शांती लाभली. निमित्त होते बेवारस मृत बांधवांच्या अस्थी विसर्जनाचे.

राष्ट्रीय कला अकादमी न्यास व पुणे महानगरपालिका ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या भावनाप्रधान कार्यक्रमाचे यंदा सलग 11 वे वर्षे होते. दरवर्षी सर्वपित्री अमावस्येला संगम घाट येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.

आरोग्य सेवा क्षेत्रात गेली 25  वर्षे निरपेक्ष काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव कुंदेन यांच्या हस्ते या अस्थीचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले.

या प्रसंगी नगरसेविका लता राजगुरु, डॉ. मिलींद भोई, पियुष शहा, बाला शुक्ला, महापालिका आरोग्य निरीक्षक विक्रम सरोदे, नागेश लांडगे, रमेश कांबळे, अजय चव्हाण आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय कला अकादमीचे मंदार रांजेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजना मागची भूमिका स्पष्ट करताना बेवारस मृत बांधवांच्या आत्म्याना शांती लाभण्यासाठी संस्थेच्या वतीने पालिकाच्या सहकार्यातून गेली 11 वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली.

या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अमर लांडे, रोमा लांडे, योगेश गोलांडे, अतुल सोनवणे, अक्षय खिवसार, जयवंत मोहने, विवेक टिळे, पल्लवी सरोदे, रुपाली निवदेकर, सुषमा खटावकर, सारिका अगज्ञान,काळूराम तिकीने यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.