Pune News: डीपीतून विमाननगरचा हरवलेला रस्ता शोधून द्या -डॉ. सिद्धार्थ धेंडे

सुनावणी न झाल्यास लाक्षणिक उपोषणाचा इशारा

एमपीसी न्यूज – विमाननगर परिसरात 1990 च्या विकास आराखड्यात (डेव्हलपमेंट प्लॅन – डीपी) प्रस्तावित रस्ता होता. परंतु 2017 मध्ये अचानक हरवलेला रस्ता शोधून द्यावा, अशी मागणी माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. या विषयावर सुनावणी घ्या अन्यथा करदात्या नागरिकांच्या हितासाठी प्रसंगी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देखील डॉ. धेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

_MPC_DIR_MPU_II

विमाननगरमधून विमानतळाकडे जाणारा हा 205 चा सुमारे 500 मीटरचा रस्ता आखला होता. 1990 च्या डीपीचा आधार घेऊन सन 2000 मध्ये या रस्त्यासाठी येथील जागांचे ताबे यादी तयार केले गेले. भूधारकांना मोबदल्यादाखल 25 कोटी रुपयांचा टीडीआरही दिल्यानंतर तो टीडीआर वापरून झाला आहे. त्यासाठी 7665 चौ.मी. जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. परंतु त्यानंतर 2010-15 ते 2017 पर्यंत डीपीत हा रस्ता दिसत आहे, याकडे डॉ. धेंडे यांनी लक्ष वेधले.

त्यानंतर विधानसभेच्या एका सदस्याने पत्र देऊन मूळ रस्त्याला लागून आणखी एक रस्ता दर्शवावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यानुसार राज्य सरकारने आणखी एक अर्धा रस्ता तेथे दर्शवला. मात्र हा रस्ता पूर्वी दिलेल्या टीडीआर आणि ताब्यात घेतलेल्या रस्त्याच्या बांधकाम परवानगीच्या विसंगत दिसत आहे, असा आक्षेप त्यांनी घेतला.

हा अर्धवट रस्ता कोठेही पुढे कोणत्याही रस्त्याला मिळत नाही. त्यामुळे त्यावरून एअरपोर्टपर्यंत जाण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात दिलेला रस्ताच हरवला आहे. शेजारी आखण्यात आलेला रस्ता कोणत्यातरी एका बांधकाम व्यावसायिकाच्या साइटपर्यंत खास अर्धा आखण्यात आला आहे, असा आरोप डॉ. धेंडे यांनी केला.

प्रामाणिक करदात्या पुणेकरांची ही फसवणूक असून न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचेही डॉ.धेंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.