Pune News : महापालिकेच्या 3 नवजात शिशू आयसीयुचे फायर ऑडीट संपन्न !

एमपीसी न्यूज : भंडारा येथील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील अग्नितांडवात 10 कोवळ्या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर पुणे महापालिकेने तातडीने पावले उचलली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापालिकेच्या रुग्णालयातील 3 नवजात शिशु अतिदक्षता विभागाचे (एनआयसीयू) फायर ऑडीट केले असून त्यामध्ये किरकोळ दुरूस्ती व्यतिरिक्त अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय येरवडा आणि सोनवणे हॉस्पिटल येथे नवजात शिशु अतिदक्षता विभाग आहेत. पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून फायर ऑडीट करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी पहिल्या टप्प्यात तातडीने महापालिकेच्या नवजात शिशू विभागांसह संपुर्ण रुग्णालयांची फायर ऑडीट करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुणे महाालिकेच्या अग्निशमन विभाग प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी विशेष पथकाद्वारे फायर ऑडीट केले. त्यामध्ये अग्निशमन यंत्रणांची किरकोळ दुरूस्ती वगळता अन्य व्यवस्था कार्यान्वित असल्याचा अहवाल महापालिका प्रशासनाला सादर केला आहे.

दरम्यान, पुणे शहरात 718 खासगी रुग्णालये आहेत. त्यामध्ये आयसीयू आणि एनआयसीयू ज्या रुग्णालयांमध्ये आहेत. त्यांच्याकडून फायर ऑडीट प्रमाणपत्र मागविण्यात येणार असल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा नाईक यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.