Pune News: कोरोना चाचणीसाठी पुण्यात पहिले ‘ड्राइव्ह अप’ संकलन केंद्र

Pune News: First 'drive up' collection center in Pune for corona testing जीनपाथच्या वाकडेवाडी येथील सफायर पार्क गॅलेरिया या ठिकाणी स्वत:च्या दुचाकीवर अथवा चारचाकी मध्ये बसून नागरिकांना या चाचण्या करता येणार आहे.

एमपीसी न्यूज – नागरिकांसाठी कोरोना चाचणी अधिक सुलभ व्हावी व जास्तीत जास्त नागरिकांना ती करता यावी यासाठी पुण्यातील जीनपाथ डायग्नोस्टिक्सच्या (जीपीडिएक्स) वतीने खास ‘ड्राइव्ह अप’ स्वॅब संकलन केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा प्रकारची शहरातील ही पहिलीच सुविधा असून 24 तासांमध्ये थेट मोबाइलवर नागरिकांना या चाचणीचे निष्कर्ष पाहता येणार आहेत.

ज्या नागरिकांना आपली ‘आरटीपीसीआर’ ही कोविड – 19 ची चाचणी करून घ्यावयाची आहे त्यांच्यासाठी ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, याच ठिकाणी रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणी, SARS-CoV-2 RNA, कोविड – 19 अ‍ॅन्टिबॉडी या चाचण्या देखील नागरिकांना करता येणार आहेत.

जीनपाथच्या वाकडेवाडी येथील सफायर पार्क गॅलेरिया या ठिकाणी स्वत:च्या दुचाकीवर अथवा चारचाकी मध्ये बसून नागरिकांना या चाचण्या करता येणार आहे. चाचणी करून घेणा-या नागरिकांनी आधार कार्ड अथवा कोणतेही सरकारी ओळखपत्र जवळ बाळगणे गरजेचे आहे याची कृपया नोंद घ्यावी. चाचणी नंतर 24 तासांच्या आत त्याचे निष्कर्ष जीनपाथच्या ऑनलाइन पोर्टलवर पाहता येतील.

डॉ. निखिल फडके यांनी 2008 साली सुरु केलेल्या जीनपाथ डायग्नोस्टिक्समध्ये मागील 4 महिन्यांमध्ये आयसीएमआर प्रमाणित किट्सच्या माध्यमातून जेनपॅथतर्फे कोविड-19 च्या 15 हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कोविड -19 संदर्भातील चाचण्या व त्यासाठी लागणा-या टेस्टिंग किट्सची निर्मिती या दोन्ही क्षेत्रात कार्यरत असणारी जीनपाथ ही देशातील एकमेव सरकारमान्य संस्था आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल जकातदार म्हणाले, “कोविड-19 विषयक चाचण्या करून घेत असताना त्या कशा असतील याबरोबरच येणा-या संभाव्य अडचणी लक्षात घेत भारतात या चाचण्या करून घेण्यासाठी स्वत:हून नागरिक तयार होत नाहीत.

हे पाहता या चाचण्या नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि सोप्या व्हाव्यात या उद्देशाने आम्ही हे ड्राईव्ह अप संकलन केंद्र सुरु करीत आहोत. ज्या नागरिकांमध्ये कोविड -19 ची कोणतीही लक्षणे नाहीत अशांसाठी ही संकलन केंद्रे महत्त्वपूर्ण ठरत आहेत.

जीनपाथ डायग्नोस्टिक्स हे शासन मान्य चाचणी केंद्र असून भारतात कोविड -19 च्या चाचण्या करण्यासंदर्भातील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल अ‍ॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अ‍ॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (एनएबीएल) यांची मान्यता देखील आम्हाला मिळाली असल्याची माहिती डॉ. जकातदार यांनी या वेळी दिली.

आमच्या येथे घेण्यात येणा-या आरटी- पीसीआर, अ‍ॅन्टिजेन, अ‍ॅन्टिबॉडी या चाचण्यांचे निष्कर्ष अचूक असून या चाचण्या देखील जागतिक दर्जाच्या सूचनांनुसार सुयोग्य पद्धतीने करण्यात येत आहे. संकलन केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाला तर पुणे शहराच्या अन्य भागांबरोबरच इतर शहरांतही केंद्रे सुरु करण्याचा आमचा मानस असल्याचेही डॉ. जकातदार यांनी सांगितले.

चाचणीचे शुल्क 2200 इतके असून सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 तर शनिवार रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत आगाऊ नोंदणी करून नागरिकांना चाचणी करून घेता येणार आहे. चाचणीनंतर 24 तासांच्या आत चाचणीचे निष्कर्ष नागरिकांना जीनपाथच्या ऑनलाईन पोर्टलवर घरबसल्या मोबाईलवर उपलब्ध होऊ शकतील. नोंदणीसाठी +91 20485666661 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.