Pune News : धमक्या देऊन खंडणी उकळणाऱ्या दीप्ती काळे आणि टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज – धमक्या देऊन खंडणी उकळल्याप्रकरणी आणि एका ज्येष्ठ नागरिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात दीप्ती सरोज काळे, निलेश उमेश शेलार यांच्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

दीप्ती काळे आणि तिच्या आठवणीने एका सराफा व्यावसायिकाकडे गुंतवणूक करून ते पैसे देण्यासाठी वारंवार दुकानावर आणि त्याच्या घरी जाऊन शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच त्यांच्या कुटुंबियांना रस्त्यावर आणण्याची धमकी देऊन असभ्य भाषेत बोलून त्यांच्या मुलाचे बरेवाईट करण्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांना अटक देखील केली आहे.

या गुन्ह्याचा तपास करत असताना दीप्ती काळे हिने गुन्हेगारी टोळी तयार केली असून मागील दहा वर्षापासून कट करून खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, कट करून खंडणी मागणे, बनावट व्हिडीओ तयार करून संगणक साधनसामुग्रीचा वापर करून अपलोड करणे अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे सिद्ध झाले आहे. मागील दहा वर्षापासून टोळी प्रमुख दीप्ती काळे आणि तिच्या टोळी विरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध मोका कारवाईचा प्रस्ताव तयार करून अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर संजय शिंदे यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर संबंधित कागदपत्रांची छाननी केल्यानंतर डॉक्टर संजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यासाठी मंजुरी दिली असून त्याप्रमाणे कारवाई करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.