Pune News : वन कामगार संघटनेचा 18 जानेवारी पासून उपोषणाचा इशारा

एमपीसी न्यूज – न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीला दप्तर दिरंगाईमुळे विलंब होत असल्याने वन कामगार संघटनेने उपोषणाचा इशारा दिला आहे. 18 जानेवारीपासून वयोवृद्ध, निवृत्त वन मजूूूूर वनविभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसणार असल्याची माहिती वन कामगार संघटनेचे सचिव प्रकाश शिंदे व कार्याध्यक्ष अनंत घरत यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

वन कामगारांनी वेळोवेळी केलेल्या विविध मागण्या व काही प्रकरणात न्यायालयाचे आदेश प्राप्त होऊन 20 वर्ष होऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने वन कामगारांना न्याय मिळावा म्हणून धरणे आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. मंत्रालयात पाठपुरावा करण्याची सर्व प्रशासकिय जबाबदारी वन अधिकाऱ्यांची असूनही कोणत्याही प्रकारे वन अधिकारी पाठपुरवठा करीत नाही. त्यामुळे न्यायालयीन निर्णय होऊनही वयोवृद्ध, निवृत्त वनमजूर न्याय मिळण्यापासून वंचित आहेत.

वर्षानुवर्ष हेलपाटे मारुनही काही निर्णय होत नसल्याने अनेक वनमजुरांचे निवृत्ती वेतन व इतर प्रश्न, मागण्या प्रलंबित राहिल्या आहेत. वन विभागाच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती वन कामगार संघटनेचे सचिव प्रकाश शिंदे व कार्याध्यक्ष अनंत घरत यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.