
Pune News : माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या अजित पवार भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

एमपीसी न्यूज – भाजपच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी आज, शुक्रवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच प्रा. कुलकर्णी या राष्ट्रवादीच्या वाटेवर तर नाही ना, अशी खमंग चर्चा सुरू झाली आहे.

2019 च्या कोथरूड विधानसभा निवडणुकीत प्रा. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यांच्या ऐवजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडूनही आले. कुलकर्णी यांचे तिकीट कापल्याने त्या नाराज असल्याची कुजबुज सुरू आहे.
आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी त्या इच्छुक आहेत. दरम्यान, आज अजित पवार यांची घेतलेली भेट ही राजकीय नव्हती. नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी ही भेट असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कुलकर्णी लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आताचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि मेधा कुलकर्णी या प्रबळ इच्छुक होत्या.
त्यावेळी या दोघांनाही चांगले पद मिळणार असल्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार मुरलीधर मोहोळ यांना महापौर करण्यात आले.
मात्र, मेधा कुलकर्णी यांना अद्यापही मानाचे पद मिळाले नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या काही दिवसांत जोरदार ‘इन्कमिंग होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुण्यातून कोणते नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, याची उत्सुकता लागली आहे.
