Pune News : चासकमान धरणात पोहण्यासाठी गेलेले चार विद्यार्थी बुडाले

एमपीसी न्यूज – पुण्यातील खेड तालुक्यातील गुंडाळवाडी गावाच्या हद्दीत चासकमान धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. गुंजाळवाडी गावातील तिवळी हिल येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलचे हे चारही विद्यार्थी आहेत. निवासी असलेल्या या विद्यार्थ्यांना उद्यापासून सुट्टी लागणार होती, त्यामुळे या शाळेतील 34 विद्यार्थी शिक्षकांसह पोहण्याचा सराव करण्यासाठी चासकमान धरणाच्या जलाशयात गेले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. 
त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, कमरे एवढ्या पाण्यात हे सर्व विद्यार्थी उभे असताना एक मोठी लाट आली आणि सहा ते सात विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. काही विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाहेर काढले; मात्र चार विद्यार्थी लाटेच्या वेगामुळे खोल पाण्यात बुडाले.

तनिषा देसाई, रीतीन डीडी, परिक्षित अग्रवाल आणि नव्या भोसले अशी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी पाण्यात पुढे घेऊन या विद्यार्थ्यांना वाचण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले. खेड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.
अत्यंत नावाजलेली सह्याद्री स्कुल ही निवासी शाळा डोंगरावर बंदिस्त स्वरुपात असताना शालेय मुले डोंगर उतरुन खाली धरणावर कशी आली? या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून पंचनामा सुरु आहे. चारही विद्यार्थ्यांना रात्री उशिरा चाकण येथील युनिकेअर या खाजगी रुग्णालयात आणण्यात आले आहे.
दरम्यान, अत्यंत उच्चभ्रु कुटुंबातील हि मुले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथील डोंगरावरील सह्याद्री स्कूल देशात प्रसिद्ध आहे. चाकण येथील युनिकेअर रुग्णालयात नातेवाईक रात्री पोहचले असून प्रशासन येथे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.