Pune News : आर्थिक फसवणूक प्रकरणातील तपासासाठी चार पथकांची स्थापना – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

एमपीसीन्यूज : फसवणूक व आर्थिक गुन्ह्याचा तपास वेगाने करण्यासह कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे. फसवणूकीच्या विविध तक्रारीच्या तपासासाठी गुन्ह्यांची वर्गवारी करून संबंधित पथकाकडे तपास सोपविण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गुप्ता म्हणाले, जमिनीच्या वादासंदर्भात प्राप्त तक्रारींचा तपास करण्यासाठी युनिट एकची स्थापना केली आहे. जमीन वाद, आर्थिक गुन्हे शाखेतील प्रशासकीय कामकाजासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी युनिट एकवार देण्यात आली आहे.

युनिट दोन बँकींग संदर्भात फसवणूकीचा तपास करणार आहे. त्यामध्ये बँक, ठेवी, गुंतवणूक आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूकीचा समावेश आहे.

त्याशिवाय युनिट तीनमध्ये हौसिंग क्षेत्रातील फसवणूक, विकसनशील गृहप्रकल्प, मोफा अ‍ॅक्ट केसेस,नोकरी, स्टॅम्प व बनावट नोटा, शैक्षणिक व वैद्यकीय प्रवेश संदर्भातील फसवणूकीचा तपास करणार आहे. यासह वरील प्रकार वगळता इतर सर्वप्रकारच्या फसवणूकीचा तपास युनिट चार करणार आहे.

तीन कोटीपेक्षा कमी रकमेचा तपास पोलीस ठाण्यांकडे

तीन कोटीपेक्षा कमी रकमेच्या फसवणूकसंदर्भातील तपास पोलीस ठाण्यांकडून करण्यात येणार आहे. त्याशिवाय तीन कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणूकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.