Pune News: व्यवस्थापन कोट्यातून MBBS ला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने अडीच कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – व्यवस्थापन कोट्यातून नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल अडीच कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रशेखर देशमुख, राजेंद्र कुशावह, पारस शर्मा आणि त्याचे इतर साथीदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किशोर रामदास शेंडे यांनी तक्रार दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा जयदीप शेंडे याला नाशिक येथील वसंतराव पवार मेडिकल महाविद्यालयात एमबीबीएस शिक्षणासाठी व्यवस्थापक कोट्यातून प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवले होते. त्यानंतर फिर्यादी यांच्या मुलाच्या नावाचे बनावट अलॉटमेंट लेटर, सिलेक्शन लेटर तयार करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.

 

त्यांच्याकडून रोख आणि चेक स्वरूपात 30 लाख 72 हजार रुपये घेतले. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न देता फिर्यादी यांच्या मुलासह इतर बारा जणांची मिळून दोन कोटी 53 लाख 17 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक डोंबाळे अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.