Pune News : जिल्ह्यातील 39 हजार शिक्षकांची कोरोना चाचणी मोफत !

एमपीसी न्यूज : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सरकारी, खासगी शाळांमधील पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण 70 हजार 633 शिक्षकांपैकी नववी ते बारावीच्या सुमारे 39 हजार शिक्षकांची कोरोनाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी मोफत होणार आहे. त्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यापैकी नववी ते बारावीच्या शाळांचे वर्ग येत्या 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. त्याबाबत तयारी करण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व शाळांसह महापालिका, जिल्हा परिषदांना दिल्या आहेत.

त्यानुसार अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नववी ते बारावीपर्यंत पुणे शहर जिल्ह्यात सुमारे 39 हजार शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण 22 हजार 522 शिक्षकांचा समावेश आहे.

संबंधित शिक्षकांची कोरोना चाचणी 23 नोव्हेंबरपूर्वी करण्याच्या सूचना दिल्या असून संबंधित भागातील शिक्षकांनी त्यांना सूचित केलेल्या कोविड केअर सेंटरवर जाऊन तपासणी करायची आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

प्रसाद पुढे म्हणाले, जिल्ह्यात 22 हजार 522 शिक्षकांची 26 स्वॅब संकलन केंद्रांवर चाचणीचे नमुने संकलित केले जाणार आहेत. दररोज 2410 जणांची चाचणी होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यापूर्वी पालकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यासाठी शाळांनी 22 नोव्हेंबरला पालक मेळावे घ्यावेत.

त्या पालक मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांना वाहनातून पाठविताना सुरक्षित वावर, मास्क आणि सॅनिटायझर्सचा वापर करण्याच्या सूचना पालकांना द्याव्यात. वर्ग सुरू होणार असले तरी राज्य सरकारने विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची शाळांसाठीची मार्गदर्शक नियमावली खालीलप्रमाणे :

– शाळांनी 9 ते 12 पर्यंतचे वर्ग सॅनिटायझर्स करावेत.

– शाळांमधील शौचालये दिवसातून तीनदा स्वच्छ करावीत.

– विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन शाळांनी ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगाच्या रकमेतून खरेदी करावी.

– शाळा सुरू झाल्यानंतर मिड डे मिलमध्ये स्वच्छता पाळावी.

– वर्गासह दुपारच्या जेवणावेळी सुरक्षित वावराच्या नियमाचे पालन करावे.

– विद्यार्थी संख्या अधिक असल्यास दोन टप्प्यात शाळा भरवावी.

– विद्यार्थ्यांना पाठविताना रिक्षा, मिनीबसचा वापर करताना सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन करावे.

– वाहनचालकांनी सुरक्षित वावराच्या नियमाचे पालन न केल्यास परवाना रद्द होऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.