Pune News : कोरोनामुळे पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ऑनलाइन शिक्षण

'पढेगा भारत' संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ :

एमपीसीन्यूज : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पालक गमाविलेल्या राज्यातील पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना निरंतर शिक्षण मिळावे यासाठी ‘पढेगा भारत’ संस्थेच्या वतीने विनामूल्य ऑनलाइन शिक्षण सुविधेचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार अमर साबळे, सभागृह नेते गणेश बिडकर, शिक्षण समिती अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक धीरज घाटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, कोरोना महामारीमध्ये अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाची कल्पना करता येणार नाही अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजाने आणि विविध संस्थांनी अशा विद्यार्थ्यांचे पालकत्व घेणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याची गरज आहे. त्या दृष्टिने पढेगा भारतचा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे.

माजी खासदार आणि संस्थापक सल्लागार अमर साबळे म्हणाले, कोरोनामुळे या विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नैतिक मूल्याधारित गोष्टी, प्रात्यक्षिकांवर आधारित कृतीशील शिक्षण आणि थ्रीडी अनिमेशन तंत्रज्ञानाचा वापर ही उपक्रमाची वैशिष्ट्ये आहेत. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल’.

संस्थेच्या अध्यक्षा वेणू साबळे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत आणि संचालक सम्यक साबळे यांनी आभार मानले.

अभ्यासक्रमाविषयी…

जगातील आदर्श समजले जाणारे फिनलॅंड शैक्षणिक धोरण आणि आपले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यांचा तौलनिक अभ्यास करून प्रथमच महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाला अनुसरून उत्कृष्ट दर्जाचे व्हिडिओ साहित्याची निर्मिती करण्यात आली आहे. शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेतील आजी-माजी 150 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.

एकूण बाराशेहून अधिक व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. पाचवी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ते उपयुक्त ठरणार आहेत. वैयक्तिकपणे किंवा शाळेच्या माध्यमातून सामुदायिक पद्धतीने लाभार्थी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी www.padegabharat.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.’

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.