Pune News : लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण धावले संविधानासाठी..!!

एमपीसी न्यूज : भारताच्या संविधानाच्या सन्मानार्थ (Pune News) आयोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘संविधान सन्मान दौड’ मध्ये चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर स्पर्धेला सुरुवात झाली.

यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीजचे प्रमुख व अधिष्ठाता डॉ.विजय खरे, अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) धर्मपाल गजभये, अविनाश महातेकर, कर्नल विजय कुमार, कर्नल मुखर्जी आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकत्रित संविधनातील उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी बॉम्बे आर्मी सॲपरच्या बँड पथकाने राष्ट्रगीताचे वादन केले.

या दौडमध्ये पॅराप्लेगिक सेंटरचे वीस जवान तर आर्मीचे साठ जवान यात सहभागी झाले होते. संविधान अभ्यासक्रमाचा भाग असायला हवे. 

– चंद्रकांत पाटील

भारताच्या संविधानाबाबत प्रत्येकालाच माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी (Pune News) संविधान हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असायला हवे असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, लवकरच याबाबत नरेंद्र मोदी नवीन शैक्षणिक बदल करणार असून त्यामध्ये या सर्व आवश्यक बदलांचा समावेश असेल. इतक्या पहाटे सर्व नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत याचा मला आनंद वाटतो आहे असेही ते यावेळी म्हणाले.

संविधनाचा जीवनात अंगीकार करा – डॉ.कारभारी काळे

डॉ.कारभारी काळे म्हणाले, संविधनाने आपल्याला दिलेल्या ताकदीचे आकलन करून त्याचा उपयोग आपले जीवन अधिक चांगले करण्यासाठी करावा. मात्र त्यासोबतच आपली कर्तव्ये विसरता कामा नये. संविधानाने आपल्याला जो विचार दिला आहे तो प्रत्येकाने आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे. भारतीय संविधानाची ताकद ही जगभरात पोहोचली आहे.

अमिताभ गुप्ता म्हणाले, आज आपण प्रत्येक गोष्टीसाठी संविधान अभ्यासतो, ही संविधानाची ताकद आहे. या दौडमध्ये सहभागी झालेल्यांना आपले शारीरिक स्वास्थ सुदृढ ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी अनुक्रमे 10, 5 व 3 किलोमीटर धावण्याच्या या स्पर्धेत विजेत्या (Pune News) स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली तर सहभागींना प्रमाणपत्र व पदक देण्यात आले. या एकूणच कार्यक्रमाला आर्मी व सदर्न कमांडचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.