Pune News: फळभाज्यांची आवक घटली; बटाटा, भेंडी, फ्लॉवरचे दर वाढले

मागणी व पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत

एमपीसी न्यूज – सतत सुरू असलेला पाऊस आणि गणेश चतुर्थीमुळे कमी झालेल्या काढणीमुळे मार्केटयार्डात फळभाज्यांची आवक घटली आहे. परिणामी, बटाटा, शेवगा, भेंडी, कारली, दोडका, फ्लॉवरचे दर वाढले आहेत. दुसरीकडे आवक वाढल्यामुळे टोमॅटोचे भाव घटले आहेत. मागणी व पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत, अशी माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी रविवारी दिली.

रविवारी बाजारात 70 ते 80 गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, इंदूर येथून 6 टेम्पो गाजर, आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथून 2 ते 3 टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची 10 ते 12 ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आले 1100 पोती, टॉमेटो दीड ते दोन हजार पेटी, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 5 ते 6 टेम्पो, भुईमूग 150 पोती, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, तांबडा भोपळाची 8 ते 10 टेम्पो, कांदा 70 ते 75 ट्रक, आग्रा व इंदूर येथून प्रत्येकी 40 टेम्पो बटाट्याची आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : 100-140, बटाटा : 230-280, लसूण : 700-1100, आले : 200-400, भेंडी : 200-300, गवार : 300-400, टोमॅटो : 100-160, दोडका : 250-300, हिरवी मिरची : 200-300, दुधी भोपळा : 80-140, चवळी : 200-220, काकडी : 80-120, कारली : हिरवी 250-300, पांढरी 200-220, पापडी : 180-200, पडवळ : 150-200, फ्लॉवर : 150-200, कोबी : 60-120, वांगी : 200-250, डिंगरी : 180-200.

नवलकोल : 80-100, ढोबळी मिरची : 200-250, तोंडली : कळी 200-250, जाड : 100-120, शेवगा : 500-600, गाजर : 140-160, वालवर : 250-280, बीट : 80-100, घेवडा : 300-350, कोहळा : 100-120, आर्वी : 150-200, घोसावळे : 150-200, ढेमसे : 200-220, पावटा : 300-400, भुईमूग शेंग : 350-400, मटार : 700-850, तांबडा भोपळा : 80-100, सुरण : 180-200, मका कणीस : 60-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.

कोथिंबिर, कांदापात व चुका वगळता उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव तेजीत आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सर्वाधिक पालकच्या भावात जुडीमागे सात रुपयांनी वाढ झाली आहे. तर, मेथी व शेपूच्या भावात प्रत्येकी चार रुपये आणि मुळेच्या भावात 3 रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व पालेभाज्याच्या भावात जुडीमागे सुमारे 1 रुपयांनी वाढ झाली आहे.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 1500-2500, मेथी : 1000-1600, शेपू : 600-1000, कांदापात : 600-1000, चाकवत : 500-800, करडई : 500-800, पुदिना : 300-600, अंबाडी : 500-800, मुळे : 1000-1500, राजगिरा : 500-800, चुका : 500-600, चवळई : 500-600, पालक : 1000-1500.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.