FTII Student Agitations: FTII च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा उपसले आंदोलनाचे हत्यार

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना करावा लागला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सामना

एमपीसी न्यूज – पुण्यातील FTII च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे (FTII Student Agitations) हत्यार उपसले आहे. यावेळी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सामना करावा लागला. अनुराग ठाकूर गुरुवारी एफटीआयआय परिसरात आले असताना विद्यार्थ्यांनी त्याच्यासमोर आंदोलन केले. जोपर्यंत अनुराग ठाकूर या परिसरात होते तोपर्यंत विद्यार्थी हातात पोस्टर्स आणि बॅनर घेऊन घोषणाबाजी करत राहिले. 

मागील काही दिवसांपासून अनुराग ठाकूर यांचे वक्तव्य सांप्रदायिक आणि समाजात तेढ निर्माण करणारी असल्याचे म्हणत या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.  तसेच FTII मध्ये सातत्याने होणाऱ्या फी वाढीचा निषेधही विद्यार्थ्यांनी या वेळी केला. FTII स्टुडंट फेडरेशननेही याला पाठिंबा दिला. अनुराग ठाकूर यांचे विचारधारा आणि त्यांच्या पूर्वाश्रमीच्या कार्याचा विरोध असल्याचं सांगत स्टुडंट फेडरेशनच्या वतीने देखील या आंदोलनाला (FTII Student Agitations) पाठिंबा दिला.

दरम्यान अनुराग ठाकूर संस्थेत येण्यापूर्वी माहिती प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अपूर्व चंद्रा यांच्याकडून धमकी मिळाल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. अनुराग ठाकूर यांच्या कार्यक्रमादरम्यान जर निदर्शने करण्यात आली तर मंत्रालयाकडून संस्थेला देण्यात येणार्‍या निधीत कपात करण्यात येईल, अशी धमकी दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
दुसरीकडे विद्यार्थ्यांनी अनुराग ठाकूर संस्थेत आल्यानंतर त्यांच्या विरोधात मौन प्रदर्शन सुरू केले. त्यानंतर वारंवार विनंती करूनही ठाकूर यांना भेटण्यासाठी केवळ दोन मिनिटांचा अवधी देण्यात आला. या कालावधीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या ठाकूर यांच्या समोर एका कागदावर लिहून ठेवल्या. त्यावर ठाकूर यांनी कोणतेही भाषण केले नसल्याचे ही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.