Pune News : खुनाच्या गुन्ह्यात फरारी श्याम दाभाडे टोळीच्या सदस्याला मुंबईतून अटक

एमपीसी न्यूज – गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने खुनाच्या गुन्ह्यात मागील दोन महिन्यांपासून फरार असलेला श्याम दाभाडे टोळीचा सदस्य योगेश उर्फ पप्पू प्रकाश दाभाडे (वय 24, रा. कुळे, मुळशी) याला मुंबईतील चेंबूर परिसरातून अटक केली. योगेश दाभाडे चेंबूर परिसरात नाव बदलून राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये योगेश दाभाडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी व्याजाच्या पैशावरून मयूर भागवत याचे कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपहरण केले होते. त्यानंतर मुळशीत नेऊन त्याचा खून केला होता. पौड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी योगेश दाभाडे हा चेंबूर परिसरात नाव बदलून जात असल्याची गुप्त माहिती खंडणीविरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे खंडणीविरोधी पथकाच्या पोलिसांनी सापळा रचून चेंबूर येथून योगेश उर्फ पप्पू प्रकाश दाभाडे याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने त्याचे नाव साहिल असल्याचे सांगितले होते. परंतु पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने खरे नाव योगेश दाभाडे असल्याची कबुली दिली. तसेच त्याने मयूर भागवत याचा खून केल्याची कबुली दिली. हा गुन्हा केल्यानंतर तो चेंबूर येथे जाऊन नाव बदलून राहत असल्याचे सांगितले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस कर्मचारी नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, प्रफुल चव्हाण, विवेक जाधव, हनुमंत कांदे आणि त्यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.