Pune News : पुणे-नगर रस्त्यासाठी ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी’ प्रकल्प राबविण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करुन देणार – उपमुख्यमंत्री 

एमपीसी न्यूज – गेल्या 14-15 वर्षांपासून दिवसेंदिवस गहन होत चाललेल्या पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे सुचविलेला ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी’ हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करुन देण्याचे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्रकल्पाचे सादरीकरण नुकतेच मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे विनय देशपांडे, सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. साळुंखे, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, सी. व्ही. कांड प्रकल्प सल्लागार संस्थेचे मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

वाघोली ते शिरुर दरम्यान होणारी वाहतूक कोंडीकोंडी हा नित्याचा विषय बनला आहे. त्यामुळे गेले काही महिने डॉ. कोल्हे यांनी सातत्याने कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लानची संकल्पना मांडली होती. मात्र तेवढ्यावर न थांबता विविध पर्यायांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना सप्टेंबर महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांना दिल्या होत्या. त्यानुसार अधीक्षक अभियंता चव्हाण यांनी वेगवेगळ्या तीन पर्यायांचा समावेश मोबिलिटी प्लानचे सादरीकरण तयार केले. सहापदरीकरण, सेवा रस्ते व आवश्यक तेथे पूल आदींचा समावेश या प्रकल्पात असणार आहे.

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पीएमआरडीएचे अधिकारी एकत्र बसून सादरीकरणात सुचवलेल्या तीन पर्यायांपैकी कोणता पर्याय योग्य ठरेल याचा निर्णय घ्या आणि तातडीने प्रस्ताव सादर करा. आगामी अर्थसंकल्पात मी या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन देतो असे सांगितले.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, उपमुख्यमंत्री पवार यांनी निधी उपलब्ध करुन देण्याचे सुतोवाच केल्याने पुणे – नगर रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न सुटण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे असे म्हणावे लागेल. आता तातडीने यापैकी पर्याय निश्चित करुन अंदाजपत्रकासह प्रस्ताव सादर करण्यासाठी मी स्वतः व आमदार अशोक पवार प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगून डॉ. कोल्हे म्हणाले की, या प्रकल्पाबरोबरच भविष्यात येणारा मेट्रो प्रकल्प लक्षात घेऊन वाघोली येथे मल्टिमोडल हब व्हावे यासाठी आमदार पवार आणि मी एकत्रितपणे प्रयत्नशील करणार आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.