Pune News : फुरसुंगी आणि उरूळी देवाची होणार नगरपालिका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिका (Pune News) हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच, नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर व मुलभूत सोयी सुविधांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीस माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक उपस्थित होते.

फुरसुंगी आणि उरूळी देवाची नागरिकांनी आपली नगरपालिका (Pune News) राज्यातील एक सर्वोत्कृष्ट अशी नगरपालिका ठरावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच, पुणे नगरपालिकेने या दोन्ही गावांत नागरी सुविधांशी संबंधित सुरु केलेल्या प्रकल्प, योजनामंध्ये सहकार्य देणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नगरपालिका करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उपस्थित फुरसुंगी आणि ऊरळी देवाची येथील नागरिकांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. पुणे महानगरपालिकेमध्ये 2017 मध्ये 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या फुरसूंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख लोकसंख्या आहे.

PCMC: शहरातील मृत जनावरांचे पुण्यातील विद्युत दाहिनीत दहन करणार, दर महिन्याला 40 जनावरे होतायेत मृत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.