Pune News : गणराया कोरोनाचे संकट लवकर संपू दे : सुप्रिया सुळे

कोरोनाच्या संकट काळात डॉक्टर, पोलीस, कर्मचारी यांच्या कामाला आपण मुजरा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकर योग्य ती खबरदारी घेऊन उत्सव साजरा करीत आहेत. कोरोनाचे हे संकट लवकर संपू दे, असे साकडे आज, शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी गणरायाला घातले.

पुणे महापालिकेच्या धनकवडी – सहकारनगर कार्यालयातर्फे लोकनेते ना. शरदचंद्रजी पवार बहुद्देशीय भवन ( कोविड 19) संसर्ग चाचणी केंद्राला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी कोरोनारूपी संकट निवारण करण्यासाठी गणरायाकडे प्रार्थना केली.

या वेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक विशाल तांबे यांच्या विकासनिधीतून उभारण्यात आलेल्या ओपन जिम, वॉटर टँकर, विरंगुळा केंद्राचे उदघाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख, नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे, नगरसेविका अश्विनी भागवत, माजी नगरसेवक संतोष फरांदे, काका चव्हाण उपस्थित होते.

या केंद्रात रोज अँटीजेन किटद्वारे 200 आणि घशातील नमुने घेऊन 200 अशा 400 चाचण्या करण्यात येतात. परिसरातील नागरिकांना याचा लाभ होत असल्याची माहिती विशाल तांबे यांनी सुप्रिया सुळे यांना दिली.

तर, सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः पीपीई किट घालून घरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या महिलेवर रात्रभर जागून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. त्यांच्या या कार्याबद्दल सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

पुणे शहरात कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात टेस्ट होत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार सातत्याने आढावा बैठक घेत आहेत.

सर्व मिळून आपण लवकरच कोरोनाच्या या संकटवर मात करणार असल्याचा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला. तर, कोरोनाच्या संकट काळात डॉक्टर, पोलीस, कर्मचारी यांच्या कामाला आपण मुजरा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.