Pune News: ‘गे’ अ‍ॅपवरील मैत्री नडली, तरुणाला मारहाण करत 81 हजाराला लुटले

फिर्यादी 34 वर्षीय तरुण धायरी परिसरातील रहिवाशी असून त्याचे लग्न झाले आहे. त्याने काही दिवसांपूर्वी गे चॅट अ‍ॅप डाउनलोड केले होते.

एमपीसी न्यूज- धायरी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला गे चॅट अ‍ॅपवरील मैत्री 81 हजारांना पडली आहे. समलैंगिक संबंध करण्याच्या उद्देशाने अनोळखी ठिकाणी गेलेल्या तरुणाला तीन हल्लेखोरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याची लूट केली. याप्रकरणी पीडित तरुणाने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 34 वर्षीय तरुण धायरी परिसरातील रहिवाशी असून त्याचे लग्न झाले आहे. त्याने काही दिवसांपूर्वी गे चॅट अ‍ॅप डाउनलोड केले होते. 9 ऑगस्टला अ‍ॅपवर चॅट करताना एका रवी नावाच्या मुलाने फिर्यादी तरुणाला रिक्वेस्ट पाठविली होती.

त्यानुसार त्यांचे चॅटिंग सुरु झाले होते. त्यानंतर रवीने फिर्यादी तरुणाला पत्ता देऊन नांदेड फाटा परिसरातील एका ठिकाणी बोलावले. फिर्यादी तरुण चव्हाणनगरमधील परिसरात गेला. त्याठिकाणी रवी आणि तरुणाची भेट झाली. तेवढ्यात तिघांनी तिथे येऊन फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडील सोन्या-चांदीचे लॉकेट घेतले. पेटीएम आणि गुगलपेद्वारे मिळून 81 हजारांची फसवणूक केली.

दरम्यान, सिंहगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश उमरे यांनी नागरिकांनी अनावश्यक मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करण्याच्या मोहात न पडण्याचा सल्ला दिला आहे. संबंधित प्रकरणाचा तपास केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.