Pune News : स्वयं चार्जिंग ‘पाय-कार’ निर्मितीसाठी पुण्यात जर्मनीची मोठी गुंतवणूक

एमपीसी न्यूज : ऊर्जेचा अमर्याद स्रोत म्हणून (Pune News) नव्यानेच सिद्ध झालेल्या न्यूट्रिनो ऊर्जेकडे पाहिले जात आहे. ऊर्जेच्या या स्रोतापासून ‘न्यूट्रिनो व्होल्टाईक घट’ तयार करून विद्युत ऊर्जा मिळवण्यासाठी जर्मनीच्या न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप भारतात गुंतवणूक करणार आहे. यासंबंधी न्यूट्रिनो क्यूबला लागणारे क्रिटिकल मटेरियल विकसित करण्यासाठी पुण्यातील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिकशी (सी-मेट) सहकार्य करणार आहे. पुढील तीन वर्षात टेस्लाच्या धर्तीवर पूर्ण न्यूट्रिनो एनर्जीवाली स्वयं चार्जिंग होणारी ‘पाय-कार’ विकसित करण्यात येणार आहे.

पाषाण रस्त्यावरील ‘सी-मेट’मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जर्मनीच्या न्युट्रिनो ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॉलगर थोर्स्टन स्कुबर्ट व स्पेल टेक्नॉलॉजीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्रकुमार शर्मा यांनी दिली. प्रसंगी न्युट्रिनो ग्रुपचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. थोर्स्टन लुडविग, न्यूट्रिनो इंडियाचे संचालक (ऑपरेशन्स) सूर्या शर्मा व वरिष्ठ पत्रकार आणि ब्रह्माकुमारी संस्थचे बी. के. करुणा भाई उपस्थित होते. सी-मेट ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असून, त्याचे महासंचालक डॉ. भारत काळे हे आहेत.

होलगर थोर्स्टन म्हणाले, “न्यूट्रिनो कणांपासून विद्युत ऊर्जा मिळविणे, ही मानवी इतिहासाला कलाटणी देणारी घटना असेल. या सहकार्य कराराच्या माध्यमातून संशोधन आणि विकासाची कामे केली जाणार असून, त्यातील स्वामित्व हक्क आणि संशोधनाचे हस्तांतरण संबंधी नियम निश्चित करण्यात आले (Pune News) आहेत. यासाठी पुढील तीन वर्षांकरिता 22 हजार कोटीपेक्षा अधिक (2.5 बिलियन युरो) गुंतवणूक करण्यात येणार आहे. न्यूट्रिनो एनर्जीचे संशोधनाच्या आधारे स्पेल (SPEL) मध्ये प्रत्यक्ष सुपर कपॅसिटर ईंटेग्रेट करून वर्किंग प्रोटोटाईप तयार केला जाणार आहे.

डॉ. राजेंद्रकुमार शर्मा म्हणाले, “या पाय-कारसाठी जर्मनीच्या ग्रुपने इतकी मोठी गुंतवणूक करण्यासाठी तयारी दाखविणे भारतीय आणि पुणेकरांसाठी आनंदाची बाब आहे. सुपर कॅपॅसिटर बनवणाऱ्या स्पेल टेक्नॉलॉजी हे न्यूट्रिनो एनर्जी डिव्हाईस तयार करणार आहे. प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भाटकर यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प पूर्ततेच्या दिशेने नेला जाणार आहे. या प्रकल्पामुळे इलेक्ट्रॉनिक व्हेईकलच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल होणार असून, भारताला आत्मनिर्भर बनविण्यास हातभार लागणार आहे.”

‘पाय-कार’ प्रकल्प स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा स्रोतांच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण (Pune News) पाऊल आहे. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्याबरोबरच रोजगार निर्मिती व भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसही मदत होईल. न्यूट्रिनो एनर्जी ग्रुपने पुढील 3 वर्षांत ‘पाय-कार’ बाजारात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे सूर्या शर्मा यांनी नमूद केले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये :

– जर्मनीच्या गटाला इलेक्ट्रॉनिक्स पदार्थ, क्वाँटम डॉट्स, द्वीमितीय पदार्थांच्या संशोधनासाठी सी-मेट सहकार्य करणार
– सी-मेट न्यूट्रिनो व्होल्टाईक घटासाठी लागणाऱ्या विविध पदार्थांची चाचणी करणार
– स्पेल उत्पादन पूर्व वर्किंग प्रोटोटाइप मॉडेल तयार करणार आहे
– संशोधनाचे भविष्यातील स्वामित्व हक्क आणि उत्पादनासाठी सहकार्य करारात विशेष तरतूद
– न्यट्रिनो एनर्जीच्या वापरातून चालणारी ‘कार’ अर्थात ‘पाय-कार’ विकसित करण्यात येणार

काय आहे न्यूट्रीनो एनर्जी:

न्यूट्रिनो छोटा तटस्थ मूलभूत कण आहे. सूर्यगर्भातील आण्विक प्रक्रियांद्वारे इलेक्ट्रॉन प्रक्रियांतून न्यूट्रिनोंची सतत निर्मिती होत असते. वैश्विक किरणांच्या भडिमाराने वातावरणाच्या वरच्या थरात इलेक्ट्रॉन तसेच म्युऑन यांच्यातील प्रक्रियांतून न्यूट्रिनोंची निर्मिती निरंतर चालू असते. दर सेकंदाला मानवी शरीरातून तब्बल 500 खर्व न्युट्रिनो पार होत असतात. दिवसरात्र उपलब्ध असलेल्या या न्यूट्रिनोंना विशिष्ट प्रकारच्या पदार्थांवर आदळून त्यांच्यातील ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करता येते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.