Pune News : दिल्लीत बसून राजीनामे मागण्यापेक्षा पुण्याला मदत मिळवून द्या – मोहन जोशी

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारमध्ये प्रकाश जावडेकर वजनदार मंत्री आहेत, त्यांनी पुण्यातील कोविड साथ नियंत्रणासाठी भरघोस मदत मिळवून द्यायला हवी होती, ते कर्तव्य न बजावता राज्य सरकारचा राजीनामा मागताहेत. हे ढोंगी राजकारण आहे, अशी टीका माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

राज्य सरकारची कोंडी करून अपयशी ठरविण्याचा डाव भाजप नेत्यांचा आहे, केंद्रीय मंत्री जावडेकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची वक्तव्ये हा त्याचाच भाग आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पुण्याचे रहिवासी आहेत. पुण्यात भाजपचे खासदार, चार आमदार, शंभर नगरसेवक आहेत. यांच्या मार्फत जावडेकर यांनी पुण्यात यापूर्वीच आरोग्य यंत्रणा सुसज्ज करायला हवी होती, केंद्र सरकारमार्फत ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर अशा सुविधा पुरवायला हव्या होत्या. देशाचा विचार केला तर कोविड साथीचे थैमान पुण्यात सर्वाधिक आहे, याचे गांभीर्य ओळखून केंद्राकडून अधिकाधिक पुरवठा होईल याची दक्षता जावडेकर यांनी घ्यायला हवी होती.

पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडून जावडेकर यांनी शहरातील व्यवस्थेची माहिती घ्यायला हवी होती. हे न करता राज्य सरकारच्या राजीनाम्याची मागणी जावडेकर करतात यामागे कुटील डाव आहे, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

पुण्यात साथीचा जोर अधिक आहे. अशा वेळी गर्दी टाळणे हा उपाय आहे. पण त्याचे भान भाजपच्या नेत्यांनी ठेवून आपल्या मागण्या रस्त्यावर गर्दी जमविणारी आंदोलने न करता वेगळ्या मार्गाने मांडायला हव्या. सध्या प्रत्येक पुणेकराचा साथीच्या तडाख्यापासून बचाव करणे, कोविडग्रस्तांचे जीव वाचविणे गरजेचे आहे. भाजपचे स्थानिक नेते, खासदार, आमदार यांनी आरोप प्रत्यारोप न करता साथ नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.