Pune News : ‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांची नव्या सुळक्यावर चढाई, नामकरण केले ‘कमळजाई’

एमपीसीन्यूज : पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेच्या 7 गिर्यारोहकांनी नाणेघाट परिसरातील फानगुळ गव्हाण गावानजिक असणाऱ्या एका नव्या सुळक्यावर 19 डिसेंबर 2020 रोजी यशस्वीरित्या चढाई केली. या संघाने सुळक्याचे नामकरण ‘कमळजाई’ असे केले असून गावात असणाऱ्या कमळजाई देवीच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. सुळक्याची उंची 100 फूट, तर प्रस्तरारोहणाची उंची 130 फूट आहे.

यापूर्वी सुळक्यापर्यंत कोणीही न गेल्यामुळे पायथ्यापर्यंत पोहचण्यासाठी वाट नव्हती. या सर्व गिर्यारोहकांना दाट जंगलातून पाठीवर प्रस्तरारोहणाचे जड साहित्य घेउन वाट शोधावी लागली.

या चढाईत कृष्णा ढोकळे, रोहन देसाई, डॉ. सुमित मांदळे, अंकित सोहोनी, मारिशा शहा, ऐश्वर्या घारे, अभिराम आपटे या सदस्यांनी सहभाग घेतला.

_MPC_DIR_MPU_II

या चढाईकरिता फ्रेंडस्, बॉल नटस्, पिटॉन्स्, बोल्ट, नॅचरल ॲन्कर्स या प्रस्तरारोहणातील उपकरणांचा वापर करण्यात आला. 130 फूटांच्या या चढाईत दोन स्टेशन्स लावण्यात आले होते.

ठिसूळ कातळ, आणि मधल्या टप्प्यात असणाऱ्या ओव्हरहँग(90°पेक्षा अधिक कोनातील चढाई )आणि अंतिम टप्प्यात असणाऱ्या स्क्री (घसारा )मुळे ही चढाई अधिक आव्हानात्मक झाली होती.

या सर्व गिर्यारोहकांनी ही सर्व आव्हाने पेलत अवघड असे प्रस्तरारोहण करुन शिखर गाठण्यात यश मिळविले व गिरिप्रेमीची नवनव्या सुळक्यांवर चढाई करण्याची चालत आलेली परंपरा अखंडपणे अशीच चालत राहील हे सिद्ध केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.