Pune News : खासगी हॉस्पिटलच्या ऑक्सिजनमधील 10 टक्के ऑक्सिजन पुणे महानगरपालिकेच्या रुग्णांना द्या – आबा बागुल 

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन खासगी हॉस्पिटलचा 10 टक्के वाटा स्वतःच्या रुग्णांना द्यावा, जेणेकरून गरीब पुणेकरांना चांगले उपचार आपण ऑक्सिजनसह देऊ शकू, यासाठी काँग्रेस गटनेते आबा बागुल यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे.

पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या सोईसाठी पुणे महानगरपालिकेचे हॉस्पिटल, जम्बो कोविड सेंटर, ससून हॉस्पिटल व खासगी हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ऑक्सिजनच्या अभावी पुणे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.

त्यासाठी ऑक्सिजनचा कोटा वाढवून मिळत नाही. ही परिस्थिती लक्षात घेता पुण्यातील खासगी हॉस्पिटलला सुमारे 250 टन दररोज ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो तर महानगरपालिकेच्या हॉस्पिटल व कोविड सेंटरला 25 टनच ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो आणि सध्याच्या बिकट परिस्थितीत ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर व आयसीयूची मोठ्या प्रमाणावर गरज असताना प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजनच लागतो आणि कोरोना रुग्णांना वाचवण्यात ऑक्सिजनची फार मोठी मदत होते. ही बाब लक्षात घेऊन खासगी हॉस्पिटलमधील 250 टन ऑक्सिजन पैकी 10 टक्के ऑक्सिजन जरी पुणे महानगरपालिकेच्या सेंटरसाठी वापरला तरी सुमारे 25 टन ऑक्सिजन दररोज जम्बो कोविड सेंटरमधील गरीब रुग्णांना उपयोगी पडू शकेल त्यांचे प्राण वाचू शकेल.

तसेच खासगी हॉस्पिटलमधील 250 टन ऑक्सिजन पैकी 10 टक्के ऑक्सिजन कमी झाल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही. त्यासाठीची खासगी हॉस्पिटलमधील 10 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा महानगरपालिकेच्या हॉस्पिटल, कोविड सेंटर व ससून हॉस्पिटलला दिल्यास येथे उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांचे प्राण वाचतील,यासाठीच पुणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन खासगी हॉस्पिटलचा 10 टक्के वाटा स्वतःच्या रुग्णांना द्यावा, जेणेकरून गरीब पुणेकरांना चांगले उपचार आपण ऑक्सिजनसह देऊ शकू, यासाठी पुणे महानगरपालिकेने तातडीने पुढाकार घ्यावा, असे  निवेदन काँग्रेस गटनेते आबा बागुल यांनी दिले आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.