Pune News : मेट्रो मल्टी मॉडेल हबच्या वार्षिक नफ्यातून महापालिकेला 50 टक्के हिस्सा द्या : आबा बागुल

एमपीसी न्यूज – पुणे पेठ पर्वती स्कीम क्रमांक 3 फायनल प्लॉट क्रमांक 499व 500अ स्वारगेट येथील 28 हजार चौ. मीटर एवढ्या क्षेत्रात महामेट्रोला  मेट्रोस्टेशन करण्यासाठी व पुण्याची सार्वजनिक वाहतूक सुखकर व्हावी यासाठी रेडीरेकनर दराने महानगरपालिकेने जागा दिली आहे. सार्वजनिक हितासाठी जागा देताना रेडीरेकनर दराने जागा देणे योग्य आहे. परंतु, मेट्रोस्टेशन उभारत असताना येथे मल्टी मॉडेल हब व्यावसायिक संकुल देखील महामेट्रो करत आहे. या जागेचा वापर महामेट्रोने मेट्रो स्टेशन व्यतिरिक्त मल्टी मॉडेल हब व्यावसायिक संकुल करून नफा मिळवत असेल तर यातून होणाऱ्या वार्षिक उत्पन्नातून 40-50 टक्के हिस्सा महामेट्रोने पुणे महानगरपालिकेला द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे.

यावर महानगरपालिकेने पत्रव्यवहार सुरू केला असून महामेट्रोच्या कार्यकारी संचालकांना त्याबाबत आयुक्तांच्या मान्यतेतून हा प्रस्ताव देण्यात आला आहे. महानगरपालिकेला महामेट्रोच्या मल्टी मॉडेल हबमधून होणाऱ्या नफ्यातून 50 टक्के हिस्सा मिळून महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा भरीव स्रोत वाढेल, अशी अपेक्षा आबा बागुल यांनी व्यक्त केली.

पुणे शहरात अनेक जागा मेट्रो स्टेशनसाठी देण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन ठिकाणी मोक्याच्या जागेत महामेट्रोचा मल्टी मॉडेल हब व्यावसायिक संकुल उभारण्याचा विचार आहे. या सर्व ठिकाणच्या व्यावसायिक संकुलमधून येणाऱ्या उत्पन्नाच्या 40-50टक्के हिस्सा महानगरपालिकेला मिळावा.

महानगरपालिकेने महामेट्रोला दिलेल्या क्षेत्राचे ताबे पावती केलेली आहे. परंतु, करारनामा झालेला नाही. करारनामा करताना सदर जागेचा व्यावसायिक हेतूने वापर केल्यास पुणे महानगरपालिकेला होणाऱ्या वार्षिक नफ्यातून 40-50 टक्के हिस्सा मिळावा, अशी अट घालण्यात यावी किंवा 40-50 टक्के पार्टनरशिप करावी. स्थायी समिती मार्फत मुख्य सभेत मान्यता घेऊनच करार करावा.

महानगरपालिकेचे नफ्याच्या दृष्टीने कार्य करणे हे उद्धिष्ट नाही. परंतु, शहराला मूलभूत सुविधा देत असताना उत्पन्न वाढीसाठी विविध पर्याय शोधणे देखील महानगरपालिकेचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

महानगरपालिका सार्वजनिक हिताच्या वापरासाठी महामेट्रोला हिस्स्यापोटी 950 कोटी रुपये देणार आहे. त्यापैकी काही पैशाच्या स्वरूपात व उर्वरित जागेच्या स्वरूपात वळती करण्यात येणार आहे. मात्र, सार्वजनिक हेतू सोडून महामेट्रो व्यावसायिक हेतूने येथे मल्टी मॉडेल हब व्यावसायिक संकुल उभारत असेल तर महानगरपालिकेला नफ्यामध्ये 40  टक्के हिस्सा असणे गरजेचे आहे.

पुणे महानगरपालिकेचे व्यावसायिक प्रकल्प पाहणी करिता महापालिकेने स्वतंत्र कंन्सल्टंट नेमून महापालिकेला जास्तीत जास्त कसा प्रॉफिट मार्जिन मिळेल यासाठी त्याची मदत घ्यावी. महामेट्रो मल्टी मॉडेल हबचे प्लॅन पास करताना महानगरपालिकेच्या बांधकाम नियमावलीप्रमाणे चार्जेस भरून घ्यावे.

हा प्लॅन मंजूर करताना महानगरपालिकेचा अधिकार देखील राखून ठेवावा. यातून महानगरपालिकेला उत्पन्नाचा मोठा स्रोत निर्माण होईल. यासाठी आपण भूमिका घेऊन पुणे महानगरपालिकेला महामेट्रोच्या व्यावसायिक संकुलमधील एकूण वार्षिक नफ्याच्या 40-50 टक्के हिस्सा मिळण्यासाठी करारनाम्यात अट घालावी, अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.