Pune News : प्रत्येक कुटुंबाला दरमहा 10 हजार रुपयांची मदत द्या, मग खुशाल लॉकडाऊन करा – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – यापूर्वी केलेल्या लॉकडाऊनमध्ये देशातील सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. त्यातून अजून लोक बाहेर पडू शकलेले नाहीत. एवढे करूनही कोरोनाचा संसर्ग काही कमी झालेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन हा कोरोना संसर्ग नियंत्रित करण्याचा प्रभावी उपाय नाही, हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने पुन्हा लॉकडाऊनचा अघोरी निर्णय घेऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.

शासनाने आधी प्रत्येक कुटुंबाला दरमहा दहा हजार रुपयांची मदत द्यावी आणि खुशाल लॉकडाऊन करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

देशात पुन्हा डिसेंबर – जानेवारी दरम्यान कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिला लाट म्हणण्या ऐवजी त्सुनामी म्हणता येईल असे विधान केले. या संदर्भात नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून त्यात वरील मागणी केली आहे.

नाईक यांनी पत्रात म्हटले आहे की, शासनाने लॉकडाउन करू नये, कारण लॉकडाउन हा कोरोना आटोक्यात आणण्याचा पर्याय होऊ शकत नाही. त्या पेक्षा कोरोना चाचणी, घरोघरी जाऊन मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप करावे, फिजिकल डिस्टंसिंग तसेच दिल्ली, अहमदाबाद या शहरांतून येणारे विमान प्रवासी, रेल्वे प्रवासी यांची आधी आरटीपीसीआर चाचणी करावी, दुसऱ्या दिवशी चाचणी निगेटिव्ह आली तरच शहरात प्रवेश देण्यात यावा. अन्यथा क्वारंटाईन करावे दुबई मध्ये असेच केले जाते आपण देखील तशी एसओपी आणू शकतो.

लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य, गरीब, कष्टकरी, मजूर अशा वर्गाचे सर्वाधिक हाल होतात. रोजंदारी करून, घरी जाताना घाम गाळून कष्ट करून पन्नास, शंभर रुपये घेऊन जातो त्यात मीठ, मिरची, तेल, पीठ विकत घेतो, आणी आपल्या कुटुंबातील लेकराबाळांना दोन घास खाऊ घालतो. तरी दुसऱ्या दिवसाची पुन्हा विवंचना त्याला सतावत असते, याकडे नाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

नुकताच आता कुठे या दुष्टचक्रातून देश बाहेर आला आहे. अर्थव्यवस्था सुधारते आहे. पुन्हा लॉकडाउन करण्याचे अघोरी धाडस करू नका. आणि हे धाडस करायचेच असेल तर हातावर पोट घेऊन जगणाऱ्यांचा पोटापाण्याचा प्रश्न मिटवा. प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये दरमहा आर्थिक मदत द्या, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. शासनाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करावा. अन्यथा शासनाच्या धोरणाविरुद्ध राज्य भरात तीव्र आंदोलन केले जाईल, त्यासाठी स्वतःला अटक झाली तरी चालेल, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.