Pune News : आधी 9 हजार कोटी द्या ; मग टप्प्याटप्प्याने गावे समाविष्ट करा : महापौर मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या हद्दीमध्ये 23 गावांचा समावेश करण्याला आमचा विरोध नाही, पण यापूर्वी 2017 मध्ये ज्या 11 गावांचा समावेश झाला. त्याच्या विकासासाठी राज्यसरकारने 9 हजार कोटी रुपये द्यावे, मग टप्प्याटप्प्याने 23 गावांचा समावेश करा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली.

मासिक मुख्य सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना महापौर मोहोळ यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, महापालिकेच्या हद्दीत ज्या 11 गावांचा समावेश झाला, त्याठिकाणी रस्ते, पाणी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांची वानवा आहे. आजही टँकरने पिण्याचे पाणी पुरवठा सुरू आहे. रस्त्यांची दुरावस्था आहे.

आता नव्याने 23 गावांचा समावेश सरसकट न करता टप्प्याटप्प्याने करावे. परंतु, 2017 मध्ये 11 गावांचा विकास आराखडा तयार करून पायाभूत विकास करण्यासाठी 9 हजार कोटी रुपये निधी द्यावा. कारण पायाभूत सुविधांवर ताण येत आहे, तो कसा कमी करणार आहोत.

या सुविधा पुरविताना महापालिकेवर आर्थिक ताण येत आहे. राज्यसरकारने गावे समाविष्ट करताना निधी देखील द्यावा, अशी आमची आग्रही भुमिका असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.